पुरंदर विमानतळासाठी संरक्षण विभागाच्या परवानगीची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:59 AM2017-10-04T06:59:38+5:302017-10-04T06:59:51+5:30
संरक्षण विभागाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांना समर्पक उत्तरे देऊनही पुरंदर विमानतळासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.
पुणे : संरक्षण विभागाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांना समर्पक उत्तरे देऊनही पुरंदर विमानतळासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. पुरंदरच्या नियोजित विमानतळावरून होणाºया उड्डाणांमुळे हवाई दलाच्या विमानांना अडचण येणार नाही, गंभीर परिस्थितीमध्ये या विमानतळावरील नागरी आणि व्यावसायिक उड्डाणे रद्द केली जातील. तसेच देशाच्या सुरक्षेबरोबरच नागरी सोयी-सुविधा आणि विकास महत्वाचा असून पुण्याचे भौगोलिक व व्यावसायिक महत्व लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण विमानतळ प्राधिकरणाने संरक्षण विभागाला दिले होते.
पुरंदरला विमानतळ झाल्यास लोहगाव विमानतळावरून लष्कराच्या विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच पुरंदरवरून होणारी नागरी उड्डाणे आणि लोहगाववरून होणारी लष्करी विमानांची उड्डाणे यामध्ये ताळमेळ साधणे जिकिरीचे जाणार आहे. मुंबईमधील भाभा अणुसंशोधन केंद्रासह मुंबई व मुंबईच्या बंदरांची सुरक्षाव्यवस्था हवाई दलाकडे आहे. देशाच्या सीमेवर असलेला तणाव लक्षात घेता हवाई दलाची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे, अशी कारणे संरक्षण विभागाने आक्षेपामध्ये दिली होती. या आक्षेपाला उत्तर देताना, ‘लोहगावहून दिवसाला ८० विमानांचे उड्डाण होत असून तेवढीच विमाने येथे उतरतात. त्यामध्ये हवाई दलाची केवळ सहा विमाने असतात. पुरंदरचे नियोजित विमानतळ लोहगावपासून ४० किलोमीटर लांब आहे. सीमेवर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई, नवी मुंबईसोबतच पुरंदर विमानतळावरील नागरी आणि व्यावसायिक उड्डाणे रद्द केली जातील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
लोहगाव येथून होत असलेल्या नागरी, व्यावसायिक व हवाई दलाच्या विमानांचे उड्डाण होत आहे. हवाई दलाच्या उड्डाणांना कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. मग ४० किलोमीटर दूर असलेल्या पुरंदरवरून संभाव्य उड्डाण होणाºया विमानांचा अडथळा कसा होईल, असा प्रश्नही उपस्थित केला होता. दरम्यान, पाच जुलै रोजी संरक्षण विभाग, विमानतळ प्राधिकरण, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी बैठक घेतली होती. भाभा अणुसंशोधन केंद्राकडून इशारा दिला गेल्यास हवाई दलाची विमाने लोहगाव विमानतळावरून उड्डाण करून नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कक्षेमधून जातील. असे असताना त्या विमानतळाला कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नसल्याचे या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले होते. या बैठकीनंतर आॅगस्टमध्ये परवानगी मिळेल,असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु, निर्णय अद्याप घेण्यात आला नाही.