भरतीची प्रतीक्षा : राज्यात प्राध्यापकांची पाच हजार पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:27 AM2017-12-22T06:27:23+5:302017-12-22T06:29:04+5:30
राज्यात विविध विद्यापीठांशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांतील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच प्राचार्य, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांच्या अनेक पदेही भरतीच्या प्रतीक्षेत असून ‘अ’ गटातील एकूण ५ हजार ७७० पदे रिक्त राहिली आहेत.
राजानंद मोरे
पुणे : राज्यात विविध विद्यापीठांशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांतील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच प्राचार्य, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांच्या अनेक पदेही भरतीच्या प्रतीक्षेत असून ‘अ’ गटातील एकूण ५ हजार ७७० पदे रिक्त राहिली आहेत.
मागील काही वर्षांपासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर
कर्मचा-यांची भरती प्रक्रिया बंद आहे. एकीकडे राज्य शासनाकडून शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबाबत सर्व विद्यापीठांना विविध पातळ्यांवर सूचनाही दिल्या आहेत. मात्र, या उपाययोजना करत असताना शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यातील एकूण ११७२ खासगी अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १९० महाविद्यालये नागपूर विभागात आहेत. एकूण महाविद्यालयांमध्ये शासनाने ११५७ प्राचार्य, ११५३ ग्रंथपाल तर २८ हजार ३३६ अधिव्याख्याताची पदे मंजूर केली आहे.
तसेच शासकीय शिक्षण संचालकांची ९६० पदे मंजूर आहेत. ही संख्या दि. १ आॅक्टोबर २०११ च्या विद्यार्थी संख्येनुसार असून ३० जून २०१७ पर्यंत मंजुरी दिलेली आहे. २०११ पासून महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, शासनाकडून त्याला अनुसरून पदांची संख्या वाढविलेली नाही.
उच्च शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण खासगी अनुदानित महाविद्यालयांपैकी २३१ महाविद्यालयांमध्ये ३० जूनअखेरपर्यंत प्राचार्यपदे रिक्त होती, तर अधिव्याख्याताची तब्बल ५ हजार २२९ पदे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच गं्रथपालांची १८३ आणि शारीरिक शिक्षण संचालकांची १३६ पदे रिक्त आहेत.
अशी एकूण ५ हजार ७७९ पदांची भरती प्रक्रिया रखडली
आहे. जुन्याच विद्यार्थिसंख्येच्या आधारावर प्राध्यापक असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे. त्यातच भरती बंद असून पदेही रिक्त आहेत. परिणामी, शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकविणार, असा प्रश्न या महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. सध्याच्या विद्यार्थिसंख्येचा विचार केल्यास या पदांची आणखी मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून, ती शासनाकडून तातडीने भरली जावीत, अशी मागणी उच्च शिक्षण वर्तुळात सातत्याने होते.
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील पदे
गट अ मंजूर पदे रिक्त पदे
(दि. ३० जूनपर्यंत) (दि. ३० जूनपर्यंत)
प्राचार्य ११५७ २३१
ग्रंथपाल ११५३ १८३
अधिव्याख्याता २८३३६ ५२२९
शा. शि. संचालक ९६० १३६
एकूण ३१६०६ ५७७९