आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा
By Admin | Published: April 30, 2015 11:54 PM2015-04-30T23:54:21+5:302015-04-30T23:54:21+5:30
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे.
पुणे : गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेला व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. शासनाने पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर तरी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार असा प्रश्न उपस्थित
केला जात आहे.
१९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच चाकणच्या उत्तरेस पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्व्हे करण्यात आला.
या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा अभिप्राय एमएडीसी (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी) दिला. त्यामुळे विमानतळासाठी पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरु झाला आणि कडूस-पाईट येथे विमानतळ करता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु याबाबत देखील गेले दोन वर्षे काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यात राज्य शासनाने सेझसाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही जमीनदेखील विमानतळासाठी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे भाजप सरकारच्या काळात पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
४शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.