गणवेशासाठी महिनाभराची प्रतीक्षा, विलंबाने वाटपाची परंपरा यंदाही कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:01 AM2018-06-14T02:01:59+5:302018-06-14T02:01:59+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत जुन्या गणवेशावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे.
बारामती - शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत जुन्या गणवेशावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे.
बारामती नगरपालिकेच्या नऊ मराठी, तर एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळांमधून १ हजार ९६१ विद्यार्थी यंदा शिक्षण घेणार आहेत. नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश, पायमोजे, दप्तर, बूट यांचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी या वस्तू शाळेमार्फत विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.
मात्र, नगरपालिका प्रशासनाने यंदाही या वस्तूंच्या वाटपातील दिरंगाई कायम ठेवली आहे. या वस्तू खरेदी करण्याबाबतची निविदा प्रक्रिया नुकतीच मंजूर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचे नगरपालिका अधिकाऱ्यांकडूनच स्पष्ट करण्यात आले.
मागील वर्षीही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेशाचे वाटप झाले नव्हते. विद्यार्थीसंख्या सुमारे २ हजार असतानाही प्रशासनाकडून
वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.
सर्व शाळा दि. १५ जून रोजी सुरू होणार असल्याचे आधीपासूनच जगजाहीर आहे. तरीही पालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला गेला. वेळेत गणवेश मिळत देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
पहिल्या दिवशी पुस्तके नाहीच
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके मिळणार आहेत. शासकीय व अनुदानित शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना मिळतील, असे बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी जाहीर केले होते. मात्र, बारामती नगरपालिकेच्या शाळांना अद्यापही ही पुस्तके मिळाली नाही. ‘पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध पुस्तके देण्यात येणार आहेत. मात्र अभ्यासक्रम बदललेल्या इयत्तांची पुस्तके अद्याप मिळाली नाहीत’, असे नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी महेश पवार यांनी सागितले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे होणार स्वागत
तालुक्यातील २७९ जिल्हा परिषद शाळांमधील ३८ हजार ९२३ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी १ लाख २१ हजार ८६१ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी सांगितले. तालुक्यातील शाळांच्या खात्यावर गणवेशासाठी ४५ लाख १५ हजार रुपये शिक्षण विभागाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. मात्र, गणवेश खरेदीच्या पावत्या शाळेकडे जमा केल्यानंतर गणवेशांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्येदेखील पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशात दिसणार का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तर शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे गावातील पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळांमध्ये स्वागत करण्यात येणार आहे.