‘वकिली व्यवसायातील नीतिमत्ता हरवली’
By admin | Published: December 21, 2015 12:37 AM2015-12-21T00:37:19+5:302015-12-21T00:37:19+5:30
न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे.
बारामती : न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे. अन्याय दूर करण्याचे कर्तव्य स्वीकारण्याऐवजी युक्तीवादातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
बारामती येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित बारामती, इंदापूर, दौंड वकील परिषदेत ते बोलत होते.
धर्माधिकारी म्हणाले, समाजात डॉक्टर, वकिलांना देवासमान मानले जाते. देवत्वाचे स्थान दिले जाते. मात्र,अशा वेळी वकिली व्यवसाय म्हणून अंगीकारला, का त्याचा धंदा केला. याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे. व्यवसाय करताना नीतिमत्ता देखील राखणे आवश्यक आहे. त्यातून व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते. त्यासोबत राष्ट्राची मानदेखील उंचावते. मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्यही महत्त्वाचे आहे. आता मात्र नीतिमत्तेला दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यासाठी गुणवत्ता आणि नीतिमत्तेचा खरा अर्थ समजावून घेतला पाहिजे.
खरोखर अन्याय झालेल्या सर्वसामान्यांनान्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तर सर्वसामान्यांवर अन्याय सहन करण्याची वेळ येणार नाही. त्याचवेळी लोकशाही अस्तित्वात येईल. बुद्धी कौशल्यासाठी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले. आपण कर्तव्यनिष्ठ, गुणवान असता तर मला हे बोलण्याची वेळ आली नसती, असे देखील न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी या वेळी नमूद केले.
या वेळी बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय टिपसे म्हणाले, वकील परिषदांची आवश्यकता आहे. या निमित्ताने कायद्यांची चर्चा होते. त्यातून महत्त्वाचे विश्लेषण पुढे येते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल करण्यात आला. अशा दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडल्या नव्हत्या. मात्र, सामाजिक दबाव, जनक्षोभानंतर कायद्यात बदल झाले. मात्र, सामाजिक जबाबदाऱ्यांची देखील जाणीव समाजघटकांना झाली पाहिजे. तसेच, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
या वेळी अॅड. हरिष तावरे यांनी स्वागत केले. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. गुलाबराव गावडे यांनी आभार मानले. या वेळी सुमंत कोल्हे, जिल्हा सत्रन्यायाधीश राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. अॅड. रमेश कोकरे, राजेंद्र काळे, हेमचंद्र मोरे, भगवानराव खारतोडे, पंढरीनाथ नाळे यांच्यासह बारामती, दौंड, इंदापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.