उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:22+5:302021-06-27T04:09:22+5:30
पुणे : सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादर करू शकले नाही. ...
पुणे : सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादर करू शकले नाही. गेल्या पंधरा महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीका करतानाच भाजप नेेत्या पंकजा मुंडेंनी 'जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही', असा गर्भित इशारा राज्य सरकारला दिला आहे. उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो, राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी... अशा घोषणांनी कात्रज चौक दणाणून गेला होता.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी मोर्चा पुणे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात भाजप चक्काजाम आंदोलन करत असून कात्रज चौकात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले.
मन मोठे ठेवून निर्णय घेता आले पाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळे जनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे, त्यामुळे आरक्षण मिळवून देणारच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
------------------
'जोपर्यंत स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. पाच जिल्ह्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहे. हे सरकार निवडणूक आयोगाला पत्र देत आहे. पण, यांनी जर विरोधी पक्षाला सोबत घेऊन एक समिती स्थापन करून निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणूक पुढे ढकलता येतील. पण हे सरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली.