पर्यटनामुळे मनातील काव्य जागृत : मिलिंद गुणाजी; ‘नाते निसर्गाशी’चे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:42 PM2018-02-05T13:42:52+5:302018-02-05T13:45:22+5:30
पुण्यातील निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक प्रसिद्ध लेखक अनिल दामले लिखित आणि कॉन्टिन्टेल प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘नाते निसर्गाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुणाजी यांच्या हस्ते झाले.
पुणे : पर्यटनामुळे आपल्या अनुभवाची कक्षा विस्तारते. त्यामुळे आपण ज्ञानी होतो. जगात वावरल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. माणसे वाचायची आणि ओळखायची सवय लागते. माझ्या मनातील कवी जागा करण्याचे श्रेय पर्यटनालाच आहे, असे प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यटक अभ्यासक मिलिंद गुणाजी यांनी सांगितले.
पुण्यातील निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक प्रसिद्ध लेखक अनिल दामले लिखित आणि कॉन्टिन्टेल प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘नाते निसर्गाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुणाजी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. दामले सफारीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आणि प्रकाशन सोहळा असा दुहेरी योग या वेळी साधण्यात आला.
या पुस्तकाला आफ्रिकेतील प्रसिद्ध अभ्यासक ख्रिस्तोफर मॅक ब्राइड यांची प्रस्तावना लाभली असून, टांझनियातील सेरेंगेटी, बोर्नियोतील ओरांगडटान, केनियातील सावो पार्क गॅलॅपॅगोसचे अनोखे विश्व इस्रायलमधील इटराट तर बॉर्न फ्रीची लेखिका जॉय अॅडमझत अशा विविध विषयांवर आणि पर्यटनस्थळांची महती सांगणारे हे पुस्तक आहे. याप्रसंगी देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी, अमोल दामले, रंजना दामले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काही पर्यटकांनी त्यांचे अनुभव मांडले.
मिलिंद गुणाजी म्हणाले, की पर्यटनाची आवड मला माझ्या वडिलांनी लावली. योगायोगाने चित्रपटसृष्टी हेच करिअर झाल्याने व्यवसायाच्या निमित्ताने देशी-परदेशी बरीच भ्रमंती झाली. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील गड-किल्ले, देवस्थाने देखील पालथी घातली. या सर्व पर्यटनातून माझ्या मनात दडलेले काव्य जागे झाले. या वेळी गुणाजी यांनी स्वरचित काही कवितांचे सादरीकरणदेखील केले.
अनिल दामले यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली, तर देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. रंजना दामले यांनी उपस्थितांचे आभार मानले.