विद्यापीठाला उशिरा जाग
By Admin | Published: August 29, 2016 03:46 AM2016-08-29T03:46:35+5:302016-08-29T03:46:35+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी परीक्षेला बसण्यापासून रोखले होते
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी परीक्षेला बसण्यापासून रोखले होते; मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने २००८ पॅर्टनच्या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा फायदा होणार असला, तरी विद्यापीठाला उशिरा जाग आल्याने विद्यापीठ कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी २००८ पॅर्टनच्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता संपुष्टात आल्याने या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी आॅनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार नाही, अशी कमांड सॉफ्टवेअरला दिली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा विभागात गर्दी करत होते; परंतु सत्रपूर्तता झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांनी पुन्हा नव्याने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे परीक्षा
विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते.
परिणामी विद्यार्थी निराश होऊन परत गेले होते; मात्र परीक्षा विभागाने यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून, २००८ पॅर्टन व सत्रपूर्तता कालावधी संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना आॅक्टोबर २०१६ व एप्रिल २०१६ च्या परीक्षेस बसण्यास संधी दिली आहे.
विद्यापीठाकडून बी.ए., बी.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए., बीडीएमआयबी या अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज येत्या २७ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत विनाविलंब शुल्कासह स्वीकारले जातील, तर १ ते ३ सप्टेंबर या कालावधीतील विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.