माळीणच्या भयातून अजूनही येते मध्यरात्री जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:19 AM2019-07-30T06:19:59+5:302019-07-30T06:20:14+5:30
दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण : नव्या गावात रुळताहेत ग्रामस्थ; मात्र जुन्या जखमा ताज्याच
नीलेश काण्णव
घोडेगाव (पुणे) : पाच वर्षांपूर्वी ३० जुलैला पावसाने आमच्या गावावर असा काही कहर केला की सोन्यासारखं गाव क्षणात गाडले गेले. पावसाळ्यात त्या आठवणीने अजूनही दचकून जाग येते; पण जुना गाव तो गाव होता. सुरुवातीला नवीन बांधलेल्या टुमदार घरांमध्ये करमत नव्हतं, पण आता सवय झाली आहे. फक्तउन्हाळ्यात येथे पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी भावना माळीण दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण होत असताना या दुर्घटनेत आपली आई गमावलेल्या तुकाराम लेंभेयांनी व्यक्तकेली.
डोंगर कोसळून गाडल्या गेलेल्या माळीण दुर्घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमा सावरत माळीण पुन्हा उभे राहिले आहे. नवीन जागेत पुनर्वसन झाले असले, तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही मिटलेल्या नाहीत. माळीणकरांना भेटल्यानंतर त्या दिवसाची आठवण येताच प्रत्येकाला धडकी भरते. अशीच भावना सीताबाई विरणक यांनी व्यक्तकेली, डोंगर खचून गाव गाडला, गाव गेला तेव्हा असाच मुसळधार पाऊस होता. आता पाऊस दिसला, तरी भीती वाटते. पण याला आम्ही घाबरत नाय. धडाडीने येथे राहत आहोत.
माळीणमधील कमल लेंभे या महिलेच्या घराची नोंद नसल्याने तिला नवीन पुनर्वसन गावठाणात घर मिळाले नाही. दुर्घटनेतून तिचे कुटुंब बचावले, मात्र घर गेले. दुर्घटनेनंतर काही दिवसांत तिचा नवरा गेला. माळीणमध्ये सामाईक घर होते. दुर्घटनेच्या काही दिवस आधी नवीन घर बांधून पूर्ण झाले होते.
या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले. मात्र, तिच्या घराची नोंद नसल्याने घर नाकारण्यात आले. या महिलेला घर मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
माळीण दुर्घटनेत घडलेला डोंगर, या ठिकाणी बांधलेले स्मृतिवन व ग्रामस्थांनी बांधलेले मारुतीचे मंदिर.
माळीणकरांच्या अजूनही काही मागण्या अपूर्ण राहिल्या आहेत. नवीन पुनर्वसित गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाण्यासाठी घेण्यात आलेले बोअर, विहिरीचे स्रोत वाया गेले. उन्हाळ्यात दर वर्षी नवीन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. माळीण फाट्यावरून पाणी वाहावे लागते. यासाठी आसाणेमध्ये झालेल्या पायरडोहचे पाणी माळीणला मिळावे.