मोठ्यांची भांडणं फलदायी ठरतात; दिलीप प्रभावळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:04 AM2018-04-26T07:04:23+5:302018-04-26T07:04:23+5:30
अभिनयाच्या क्षेत्रात एका विशिष्ट उंचीवर असताना सगळं सोडून आध्यात्मिक मार्गाला जाणे खूप कठीण असते.
पुणे : प्रभात कंपनी आणि व्ही. शांताराम असं एक समीकरण झालं होतं. ‘माणूस’मध्ये शांतारामांनी पहिल्यांदा वसंत देसाई यांची निवड केली आणि शांता आपटे यांना नायिका म्हणून घेतले. मात्र नायिकेचे आणि व्ही. शांताराम यांचे बिनसल्याने त्यांनी शांता हुबळीकरांना आपटे यांच्या जागी आणले. मात्र त्या होत्या उंच. त्यांच्या उंचीला शोभेल असा नायक हवा म्हणून वसंत देसाई यांच्या जागी शाहू मोडक यांना घेण्यात आले... या किश्श्यामधून ‘कधी कधी मोठ्यांची भांडणंदेखील कलाकाराला फलदायी असू शकतात’ अशी मिस्कीलटिप्पणी करीत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘हा पुरस्कार म्हणजे शाहू मोडक यांचा आशीर्वाद असून, तो मला नम्र राहायला शिकवेल’ अशी भावना व्यक्त केली.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत शाहू मोडक यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शाहू मोडक प्रतिष्ठानच्या वतीने चोविसावा शाहू मोडक स्मृती पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.
या वेळी दिलीप प्रभावळकर, बालगायिका नंदिनी गायकवाड, राहुल देशमुख, ज्येष्ठ ज्योतिषी श्रीकृष्ण कर्वे गुरुजी व आर्य आढाव यांना शाहू मोडक स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना प्रभावळकर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, माजी आमदार उल्हास पवार आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभाताई शाहू मोडक उपस्थित होत्या.
शाहू मोडक यांनी आपल्या अभिनयातून मराठी मनावर ठसा उमटविला होता. डोळे दिपवणारी त्यांची प्रतिमा होती. मोडक ग्रेट अभिनेते तर होतेच; पण उत्तम माणूस होते. प्रत्येक नवीन भूमिका डोळस करते आणि पुरस्कार नम्र करतो. हा पुरस्कार मला नम्र राहायला
शिकवेल, असे प्रभावळकर यांनी सांगितले. अभिनयाच्या क्षेत्रात एका विशिष्ट उंचीवर असताना सगळं सोडून आध्यात्मिक मार्गाला जाणे खूप कठीण असते. बरेच कलाकार हाकलल्याशिवाय जात नाहीत, हल्ली बायकोला सोडणे सोपे आहे; मात्र पूर्वी दारू सिगरेट सोडणंही अवघड होतं, असे संजय मोने यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. आपली ओळख पुसून हवं ते करायचे यासाठी मोठी ताकद लागते. आपले अर्धे आयुष्य दुसऱ्याला काय हवे यातच जाते. हवं ते करता आले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास पवार यांनी आभार मानले.
दुसºया महाराजांपूर्वी बाजीराव पेशवे येऊन चालत नाही
संजय मोने हे वाक्चातुर्यासाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात दिलीप प्रभावळकर यांच्या एकेक भूमिकांचा ते उल्लेख करीत होते. पुण्यातील एका महाशयाने मध्येच ‘महात्मा गांधी’ असे नाव घेतले. त्यावर गप्प बसतील ते मोने कसले? त्यांनी तत्काळ दुसºया महाराजांच्या आधी बाजीराव पेशवे येऊन चालत नाही, अशी समयसूचकता दाखवीत टिप्पणी केली. त्याला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.