वालचंदनगर पोलिसांनी पकडली २० लाखांची अवैध वाळू; चार जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 PM2021-05-25T16:14:01+5:302021-05-25T16:14:33+5:30
पोलिसांना काझड भागात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
कळस : वालचंदनगर पोलिसांनी काझड (ता इंदापुर) येथे केलेल्या कारवाईत अवैधपणे चार ब्रास वाळूसह दोन हायवा ट्रक वाहतूक करताना आढळल्याने त्यांच्यावर २० लाखांच्या मुद्देमालासह जप्तीची कारवाई करून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना सोमवारी (दि.२४) रोजी काझड भागात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी फौजदार नितीन लकडे आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याची सूचना केली. पोलिसांच्या पथकाने काझड गावच्या हद्दीत अकोले रस्त्यावर खरात वस्ती येथे वाळू वाहतूक करणारी वाहने दिसताच छापा टाकला. यामध्ये अवैधपणे वाळूची वाहतूक करताना आढळून आले. एक पांढरा रंगाचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक (नं. MH- 12 QG-8203) आणि एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा बेळगाव बॉडी कँबीन नावाचा ट्रक (नं MH 42 T 3715) आणि प्रत्येकी 4 ब्रास वाळू असा 20,80,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अल्लाऊद्दिन खैरुद्दिन शेख ( सध्या रा. वाटलुज ता. दौंड ), संतोष पुर्ण नाव नाही( रा.मलठण ता.दौड ), राजु शेंडगे (रा. वाटलुज ता.दौड ),नितीन सुनिल लवंगारे (रा. मलठण ता.दौड जि.पुणे) यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता व पर्यावरण अधिनीयमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिंलिद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार नितीन लकडे, रमेश शिंदे, गोलांडे, जगताप, होमगार्ड पिसाळ यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास फौजदार नितिन लकडे हे करत आहेत.