वालचंदनगर पोलीस ठाणे : भाड्याच्या खोलीतून कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:44 AM2018-05-09T02:44:12+5:302018-05-09T02:44:12+5:30
वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत.
वालचंदनगर - वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत. खोल्यांचे आयुर्मान संपले असल्याने धोकादायक इमारतीत कामकाज करण्याची वेळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर आली आहे.
छतावरील पत्रे कुजलेले व पावसाळ्यात गळत असतात. पोलिसांवर तुटके पत्रे जुळवून संसार मांडण्याची वेळ आली आहे. गेल्या १० वर्षांपूर्वी शासनाने पोलीस ठाण्याला हक्काची इमारत व पोलीस कर्मचाºयांना राहण्यासाठी सुनियोजित जागेसाठी ८० लाख भरून ५ एकर जागा घेतली आहे. परंतु, शासकीय निधी मिळत नसल्याने आजही येथील कर्मचाºयांना पोलीस ठाण्याला व कर्मचाºयांना भाड्याच्या खोल्यांतच दिवस काढण्याची वेळ आलेली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यास शासकीय निधी उपलब्ध झाल्यास कर्मचारी व पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल.
इंदापूर तालुक्यात सर्वात जास्तीची लोकसंख्या असलेले जवळजवळ ४२ गाव वाड्या-वस्त्या असलेले हे पोलीस ठाणे कामकाज पाहत आहे. या पोलीस ठाण्यात ४० कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु स्वत:च्या मालकीची हक्काची इमारत नसल्यामुळे नाइलाजास्तव पोलीस कर्मचाºयांना बाहेरगावी भाड्याने राहण्यासाठी जावे लागत आहे. दुर्दैवाने अनुचित प्रकार घडल्यास कर्मचाºयांना येण्यासाठी १ तासाचा कालावधी लागतोे. त्यामुळे परिसरातच कर्मचाºयांना वसाहत उपलब्ध करून दिल्यास होणाºया घटना टाळण्यास वेळ लागणार नाही. कर्मचाºयांच्या कुटुंबातील मुलांच्या भवितव्यासाठी शैक्षणिक सुविधा वालचंदनगर शहरात उपलब्ध आहेत. मात्र, नाईलाजाने कर्मचाºयांना बाहेर राहावे लागत आहे. वसाहती नसल्याने पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनादेखील गैरसोयीचे ठरत आहे.
येथील पोलीस ठाण्याच्या सर्वसोयींनीयुक्त व वसाहतीसाठी शासनाने जवळजवळ ५ एकर जमिनीवर वसाहत व भव्य इमारत उभारणी करण्यासाठी ८० लाख महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. आज तारखेला पोलीस ठाण्याच्या नावाने ७/१२ निघत असूनही शासकीय निधीअभावी विलंब होताना दिसत आहे.
वालचंदनगर पोलीस ठाणे येथील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या पोलीस ठाण्याला इमारत व वसाहत मिळण्यासाठी सतत पाठपुरावा चालू आहे. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करून ५ एकर जमीन अंथुर्णे हद्दीत शेती महामंडळाकडून देण्यात आली आहे. या पाच एकरला पहिल्यांदा संरक्षक भिंत बांधून घेण्यात येणार आहे. तालुक्यात पहिल्यांदा एका वेळी दोन ठिकाणी निधी मिळणे कठीण असल्याने इंदापूर येथील वसाहत व इमारतीचे नियोजन झालेले आहे. नंतर वरील स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यास वालचंदनगर येथील प्रलंबित असलेली नियोजित इमारत होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे भजनावळे यांनी सांगितले.