संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना 'उठाबशा' काढण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:59 PM2020-04-15T18:59:07+5:302020-04-15T18:59:59+5:30
पोलिसांनी विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांना थेट उठाबशा काढायला लावत चांगलीच अद्दल घडविली.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतरही काही तरुण विनाकारण दुचाकीवर भटकत असल्याचे दिसून येत आहे. अशाच काही तरुणांना घराबाहेर पडण्याचे योग्य कारण न देता आल्याने पोलिसांनी चांगलेच खडसावले. या तरुणांना उठाबशा काढायला लावत चुकीची जाणीव करून दिली. संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात याकरिता दोन दोन तासांची सूट देण्यात आली आहे. परंतु नागरिक शासनाच्या या आदेशाचाही गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल पंपावरही फक्त अत्यावश्यक सेवा असलेल्या व्यक्तींनाच पेट्रोल दिले जात आहे. असे असतानाही अनेक तरुण दुचाकींनावर विनाकारण इतरत्र भटकत असल्याचे दिसत आहे. शहरात पोलिसांनी कलम १४४ ची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. जागोजाग नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनचालक कोणत्या कारणासाठी बाहेर पडलेत, त्यांच्याकडे पोलिसांचा ऑनलाईन परवाना आहे का याची शहानिशा केली जात आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही किंवा विनाकारण घराबाहेर पडले आहेत अशा वाहनचालकांवर कलम १४४ आणि १८८ नुसार कारवाई केली जात आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने सातारा रस्त्यावरील आदी शंकराचार्य चौकामध्ये (सिटीप्राईड चौक) नाकाबंदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. केंचे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या चौकात वाहनचालकांची चौकशी करीत होते. त्यावेळी काही दुचाकी चालक विनाकारण बाहेर भटकत असल्याचे तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले. काही जणांनी तर पोलिसांसोबतच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी या दुचाकी चालकांना थेट उठाबशा काढायला लावत त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यातही काही तरुण इकडे तिकडे मोबाईलवर फोन करून बचावाचा प्रयत्न करीत होते. परंतु, पोलिसांनी मात्र या तरुणांना चांगलीच अद्दल घडविली.