बारामती ते मुंबई पायी प्रवास : एसटी कामगाराचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 09:24 PM2018-03-23T21:24:52+5:302018-03-23T21:24:52+5:30
एक लाख कामगारांच्या कुटुंबांचा एक प्रतिनिधी म्हणून मी रजा घेऊन बारामती ते मुंबई हा २८२ किमी प्रवासाला ‘एकला चलो रे’चा निर्णय घेऊन निघालो आहे.
जेजुरी : बारामती एसटी आगारातील कर्मचारी मोहन चावरे हे बारामती ते मुंबई वर्षा बंगला पायी प्रवास करून कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीची मागणी करणार आहेत. गेल्या २४ महिन्यांपासून शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार रखडवला आहे. वारंवार मागण्या करूनही केवळ आश्वासनच मिळत असल्याने शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेऊन बारामती एसटी आगारातील प्रमुख कारागीर मोहन दिगंबर चावरे यांनी कालपासून बारामती ते मुंबई वर्षा बंगला पायी जाण्याचा निर्णय घेतला. आपण एसटीत ३२ वर्षे नोकरी करतो आहोत. माझ्यासाठी मी काहीही मागणार नाही, मात्र एसटी आमची आई आहे. तिचे नुकसान नको! तसेच कर्मचाऱ्यांचेही नुकसान नको, म्हणून आठ दिवसांच्या प्रवासात जे कर्मचारी माझ्या आंदोलनात सहभागी होतील त्यांनाही आपण बरोबर घेणार आहे, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२९ तारखेला वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कामगारांची गाऱ्हाणे मांडणार आहे. वेतनवाढ करण्याची आग्रही मागणी असणार आहे. चावरे हे एसटी कर्मचारी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र राजकारणातून प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे.