मेट्रो स्थानकांच्या दोन्ही बाजूंना असणार वॉक वे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:56 AM2018-12-08T01:56:13+5:302018-12-08T01:56:20+5:30
डेक्कन व छत्रपती संभाजीमहाराज उद्यानामागील मेट्रोच्या स्थानकांलगत महामेट्रो कंपनी स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी पायी चालण्याचा आकर्षक मार्ग (वॉक वे) बांधणार आहे.
पुणे : डेक्कन व छत्रपती संभाजीमहाराज उद्यानामागील मेट्रोच्या स्थानकांलगत महामेट्रो कंपनी स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी पायी चालण्याचा आकर्षक
मार्ग (वॉक वे) बांधणार आहे. त्यामुळे जंगलीमहाराज रस्त्यावरून पश्चिम पुणे, तर नदीपलीकडच्या म्हणजे पुलाचीवाडी परिसरातून पूर्व पुणे मेट्रोला जोडले जाईल. याशिवाय, फर्ग्युसन रस्त्यावरूनही थेट डेक्कन स्थानकावर येणारा एक मोठा वॉक वे बांधण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकांपासून दूर असणाऱ्या प्रवाशांनाही मेट्रो स्थानकापर्यंत येणे सोपे व्हावे, यासाठी हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. वनाझ ते रामवाडी या मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. डेक्कनवरील पीएमपी स्थानकासमोरच्या जागेत व संभाजी उद्यानात बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे नदीपात्रात मेट्रोची स्थानके आहेत. ही दोन्ही स्थानके शहराच्या मध्यवर्ती भागात; मात्र गर्दीच्या ठिकाणी आहे. रस्त्यावर असणाºया तसेच तिथून दूर असलेल्या ठिकाणांहूनही प्रवाशांना मेट्रोपर्यंत येण्यासाठी हे मार्ग बांधले जाणार आहेत. त्यासाठी नदीपात्रात एकही खांब नसेल. केबल रोप या आधुनिक तंत्रज्ञानाने ते बांधण्यात येणार आहेत.
>निर्णय वाहतूक शाखा घेणार
कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण होण्यास साधारण दीड वर्षाचा कालावधी लागेल. तोपर्यंत वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक शाखेला वाहतूक चक्राकार वळवावी किंवा एकाच बाजूने सरळ आहे तशीच ठेवावी, असे दोन पर्याय सुचविले आहेत. त्यासंबंधीचा निर्णय वाहतूक शाखा घेणार असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असे गाडगीळ यांनी सांगितले. डेक्कनवरील व पुलाचीवाडीकडील असे दोन्ही बाजूंचे प्रवासी त्यामुळे मेट्रोला मिळतील, असे स्पष्ट करून गाडगीळ म्हणाले, ‘‘या दोन वॉक वे शिवाय झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या मागील बाजूनेही एक वॉक वे प्रस्तावित करण्यात आला आहे. तो संभाजी उद्यानातून कडेने एकाही झाडाचे नुकसान न करता संभाजी उद्यान स्थानक व डेक्कन स्थानकापर्यंत जाईल. तो मेट्रोच्या बरोबर खाली मेट्रोच्याच खांबाना धरून असेल. त्यावरून नदी पाहता येईल. तसेच, तिथे वृद्धांना बसण्यासाठी बाक वगैरेही असतील.’’फर्ग्युसन महाविद्यालयापासून रस्त्याने संभाजी उद्यानात येण्यास बराच वेळ लागतो. तो वाचावा व फर्ग्युसन रस्त्यावरील प्रवासीही मेट्रोला मिळावेत, यासाठी फर्ग्युसन रस्ता ते संभाजी उद्यान असा आणखी एक मोठा वॉक वे बांधण्यात येईल. हे सर्वच वॉक वे आधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. त्यावरून चालणे सुलभ असेल. ते फक्त मेट्रोच्या प्रवाशांसाठीच असतील, असे नाही. कोणीही त्याचा वापर करू शकेल. त्यासाठी शुल्क वगैरे आकारले जाणार नाही, असे गाडगीळ यांनी सांगितले.