पुण्यात सीमा भिंत कोसळली ; धनकवडी भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:07 PM2019-07-26T18:07:08+5:302019-07-26T18:34:37+5:30
सावरकर चौकातील उंचावरील भागातील निर्मोही बंगला आणि फुलवंती अपार्टमेंट यांच्यातील सामाईक भिंत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता कोसळली.
पुणे : सावरकर चौकातील उंचावरील भागातील निर्मोही बंगला आणि फुलवंती अपार्टमेंट यांच्यातील सामाईक भिंत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता कोसळली. फुलवंती अपार्टमेंटच्या तळमजल्यावर भिंतीचा राडारोडा पडून सदनिकेत अडकून पडलेल्या महिलेला खिडकीचे गज कापून अग्निशमन जवानांनी बाहेर काढले.
धनकवडी शेवटचा बस थांब्यापासून काही अंतरावर सावरकर चौकात दुमजली निर्मोही बंगला आहे त्यात चार सदनिका आहेत. या बंगल्यालगत सखल भागात फुलवंती अपार्टमेंट ही इमारत आहे. निर्मोही अपार्टमेंट मधील तळमजल्यावरच्या भागात अक्षय पवार राहतात. पवार यांच्या टाँयलेट व बाथरूमचा भाग सीमाभिंती बरोबर फुलवंती अपार्टमेंटमधील तळमजल्यावर असलेल्या चंद्रकांत पासलकर यांच्या दरवाजावर पडला. त्यामुळे पासलकर यांचे कुटुंब दरवाजा बंद झाल्याने आत अडकून पडले होते. अग्निशामक केंद्रातील जवानांनी खिडकी चे लोखंडी गज कापून त्यांना बाहेर काढले. यावेळी कात्रज अग्निशामक केंद्राचे ताडेल ढवळे, ड्रायव्हर शाबिर शेख , फायरमन वसंत भिलारे , किरण पाटील, तेजस मांडवकर, धीरज जगताप, श्रीकांत वाघमोडे , प्रतीक शिर्के उपस्थित होते.
फुलवंती अपार्टमेंट व निर्मोही बंगाला या दोन्ही इमारतींचे बांधकाम साधारण तीस वर्षापुर्वीची आहे. यामधील फुलवंती अपार्टमेंट या इमारतीमध्ये अठरा फ्लॅट आहेत. सीमा भिंत पन्नास फुट लांब आणि साधारण पंधरा फुट उंचीची आहे. कमकुवत झालेला वीस फूटाचा भाग पहाटे अचानक कोसळला. या दोन्ही इमारतीतील सभासदांनी बैठक घेवून दुरूस्तीसाठी विचारविनीमय केला होता. परंतु पावसाळी परिस्थिती असल्याने थोडे दिवस थांबण्याचे ठरले होते. परंतु त्या अगोदरच ही घटना घडली.
घटनास्थळी सकाळी स्थानिक नगरसेवक विशाल तांबे , बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भागवत, वर्षा तापकीर तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त युनूस पठाण , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, आरोग्य निरीक्षक धनाजी नवले, दिनेश सोनवणे उपस्थित होते. तसेच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश शिद्रुप यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच आमदार भिमराव तापकीर यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने भिंत उभारून द्यावी अशी मागणी केली.