पाण्याच्या वेगवान प्रवाहात कोसळली स्मशानभूमीची भिंत; रस्त्यांचे झाले ओढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:31 PM2017-10-13T18:31:24+5:302017-10-13T18:59:48+5:30
दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीची भिंत कोसळली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली.
महर्षीनगर/ बिबवेवाडी : बिबवेवाडी स्मशानभूमीची मागील बाजूची १० ते १५ फुट उंच असलेली भिंत पावसाच्या पाण्यामुळे कोसळली. दुपारी झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे बिबवेवाडी स्मशानभूमीत पाण्याच्या प्रवाहामुळे लहान मुलांच्या दफनभूमीला लागून असलेली भिंत पडली. सुदैवाने येथे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
बिबवेवाडी स्मशानभूमीत विद्युत दाहीनीला लागूनच असलेल्या लहानमुलांच्या दफन भूमीसाठी मोकळी जागा आहे. परंतु येथे गेल्या पंधरा वर्षांपासून काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव वाचनालये, घंटागाड्या व इतर भंगारात असलेले साहित्य आणून ठेवल्यामुळे येथील मोठ्या प्रमाणावरील जागेवर भंगार साहित्याचे आतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भिंतीवर पाण्याचा दाब येऊन भिंत कोसळली. त्यामुळे भिंत कोसळल्यावर झाडांबरोबर तिथे असलेली वाचनालये पडून मदत कार्यात अडथळा निर्माण झाला. या ठिकाणी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी करून पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
रस्त्यांना आले ओढ्यांचे स्वरुप
दुपारी २.१५ च्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाने शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरीकांच्या लाखो रुपयाची उधळण करून ठेकेदाराचे खिशे भरणार्या अधिकार्यांचे उखळ पावसाने पांढरे केले आहे. बिबवेवाडी भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्येक वेळी अर्थपूर्ण चुका करून कमी व्यासाच्या पावसाळी लाईन या भागात टाकल्या जातात. जेणे करून दरवर्षी या रत्यावर पुन्हा-पुन्हा काम करता यावे. त्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागतो. तसेच येथील पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन जोडल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाईनदेखील पावसाळ्यात ओसंडून वाहताना दिसत होत्या.
या विषयी लोकमत ने ४ जूनच्या अंकात पावसाळी लाईनसाठी रस्त्याची खोदाई करून नागरिकांना त्रास होत असल्याची बातमी देखील प्रसिद्ध केली होती. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब कोण विचारणार? दरवर्षी पावसाळी लाईनसाठी लाखो रुपये खर्च करून देखील पाऊस आला की रस्त्यावर प्रचंड पाणी येते .
या पावसामुळे रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते, हातगाडीवाले, दुचाकीस्वार यांचे प्रचंड हाल झाले. अनेक दुकानात पाणी घुसले होते.