विषमतेच्या भिंती तोडाव्या लागतील
By admin | Published: March 26, 2017 02:15 AM2017-03-26T02:15:38+5:302017-03-26T02:15:38+5:30
सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे.
पुणे : सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण वैश्विक होण्याऐवजी संकुचित झालो आहोत. मोदी, ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वामुळे भिंती पडल्या की उभ्या राहिल्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भिंती तोडण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कृतज्ञता निधी संस्थेच्या वतीने वार्षिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मुंबईचे गजानन खातू, एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वाईच्या उषा ढवण आणि डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार जगदीश खैरालिया यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी भावे बोलत होत्या. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे आदी या वेळी उपस्थित होते.
भावे म्हणाल्या, ‘‘मूल्यांचा गाभा असलेलेच लोक परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकतात. सध्या बदल आणि परिवर्तन यांतील बदलच कळेनासा झाला आहे. राज्यकर्त्यांनी विकासाचे गारूड निर्माण केले आहे. विकास या शब्दाचेच भय वाटू लागले आहे. शासनाविरुद्ध बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना मरू देणार नाही, असे किंचाळून सांगणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मरू देणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहिले जाणार का? ही समीकरणे बदलण्यासाठी तरुण पिढीला नवी ऊर्जा द्यावी लागेल. रोजच्या जगण्यातील बदलांतून सामान्य माणसाची गुणवत्ता वाढविण्याची आणि माणसातील गुंतवणुकीची गरज आहे.’’
उषा ढवण आणि जगदीश खैरालिया यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष वारे यांनी प्रास्ताविक केले. काका पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून ?
मुख्यमंत्री गडबडल्यासारखे का वागत आहेत? त्यांना शेतकऱ्यांबाबत ठोस भूमिका घेता येत नाही का? असा सवाल करीत बाबा आढाव म्हणाले, ‘‘संसदीय लोकशाहीत उलथापालथ होत आहे. मूलभूत प्रश्नांना तोंड फुटले आहे. सरकारच यशामुळे सुस्त झाले आहे आणि सर्वांना शत्रू मानत आहे.
४कर्जमाफीच्या मागणीवर संघर्ष होत असताना शेतीमालाच्या हमीभावाबाबत कोणीच बोलत नाही, हा धोका आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची, सरकारला पर्याय देण्याची आवश्यकता आहे. पर्यायाशिवाय काळाचे आव्हान स्वीकारता येणार नाही. निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश सरकार कसे पचवते, याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून, असा सवालही त्यांनी केला.
शेतकरी संघटनांचे नेते आंदोलन करून सत्ताधारी झाले. शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. आजची पिढी बंडखोर झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचे योग्य दिशेने बंडात परिवर्तन करावे लागेल. प्रश्नांची उत्तरे स्वत:च्याच देशात शोधावी लागतील. त्यासाठी स्वत:च्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाशी, नव्या पिढीशी सुसंवाद साधावा लागेल. भारताची अर्थव्यवस्था शेतीमुळे टिकून आहे. त्यामुळे शेतीमालाला रास्त दर मिळाला, तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
- गजानन खातू