विनाकारण बाहेर फिराल...... तर यमलोकी जाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:17 PM2021-04-29T19:17:34+5:302021-04-29T19:18:22+5:30
यमराजाने फूल देऊन केले नागरिकांचे स्वागत
पुणे: विनाकारण बाहेर पडत असाल तर हा यमराज तुमच्या स्वागतासाठी तयारच आहे. असे सांगत आज सिंहगड रोडवर एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात गुलाब फूल घेऊन तो फिरत होता. इतकेच नव्हे तर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना त्याने आडवले. त्यांना थेट फूल देऊन तुम्हाला यमलोकी नेण्यास मी सज्ज आहे. माझ्याबरोबर येतार की गप्प घरात बसणार, असा धाक दाखवताना गुलाबाचे पुष्प देऊन उपहासात्मक स्वागत केले..
हे चित्र होते सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ आणि निमित्त होते कोरोनाचे नियम पाळण्या विषयीच्या जनजागृतीचे. पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सध्या बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज हा वेगळा प्रयोग करण्यात आला. या वेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त जयश्री काटकर-बोराडे, उपअभियंता संभाजी खोत, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आसाराम काकडे, वैद्यकीय आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड, आरोग्य निरीक्षक संतोष बाईक यांच्यासह मुकादम उपस्थित होते.
या वेळी सहायक आयुक्त बोराडे म्हणाल्या, विनाकारण बाहेर फिरणे हे सध्या अत्यंत जोखमीचे आहे. कोरोनाची लागण झाल्यास बेड मिळण्यापासून ऑक्सिजन, इंजेक्शन मिळेपर्यंत अनेक अडचणी येतात. त्यामुळे रु्ग्णांचे हाल होतातच; मात्र रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळीने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बाहेर पडणे म्हणजे यमराजाच्या भेटीला जाण्यासारखेच आहेच. त्यामुळे आम्ही प्रतीकात्मक यमराज बनवून त्याव्दारे नागरिकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. गर्दीच्या ठिकाणी असा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. गुलाबाच्या फुलांबरोबर दंडाचा बडगाही उगारण्यात येणार आहे.
पोलिसांचा केला सत्कार
लोकांनी बाहेर पडू नये. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या सिंहगड रोड पोलीस व वाहतूक पोलिसांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास गेव्हारे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, हवलदार गेव्हारे आदी उपस्थित होते.