जिल्ह्यातील शाळांसाठी फिरते ग्रंथालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:50 PM2018-05-19T12:50:08+5:302018-05-19T12:50:08+5:30
फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : इंटरनेटचा भडिमार, मनोरंजनाचे वाढलेले पर्याय या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील वाचनाची अभिरुची कमी होत चालली आहे, असे सातत्याने म्हटले जाते. मात्र, केवळ ओरडा करण्यापेक्षा ‘अक्षरभारती’तर्फे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जात आहे. फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संगणकसाक्षर करण्याच्या दृष्टीने ज्युनिअर आर्यभट्ट हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
आजकालची मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नित्यनेमाने केली जाते. मात्र, अभिरुची विकसित होण्यासाठी त्यांच्यापर्यंत वाचनीय पुस्तके पोचतात का, या मुलभूत प्रश्नाची उकलच केली जात नाही. शासनाकडून बहुतांश शाळांच्या ग्रंथालयांना नवीन पुस्तकेच उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर अक्षरभारती या संस्थेने पुढाकार घेऊन मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोचवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ‘लायब्ररी आॅन व्हील्स’ हा अभिनव उपक्रम राबवली जात आहे.
सुरुवातीला अक्षरभारतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ११०० हून अधिक ग्रंथालयांना हातभार लावला. प्रत्येक शाळेतील ग्रंथालयांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील २००-८०० पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. यामध्ये पुणे, मुळशी, मावळ येथील ५० हून अधिक शाळांना समाविष्ट करुन घेण्यात आले. या पुस्तकांची देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. अक्षरभारतीचे कार्यकर्ते दर महिन्याला ग्रंथालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. या ग्रंथालयांमध्ये मुलांसाठी वाचन, गोष्ट सांगणे, निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची आवड जाणून घेऊन पुढील पुस्तकांची निवड केली जाते, अशी माहिती ‘अक्षरभारती’चे केदार तापीकर यांनी दिली.
फिरत्या ग्रंथालयात काही हजार पुस्तके उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. फिरते ग्रंथालय शाळांना महिन्यातून एकदा भेट देते. यावेळी मुलांना आधीची पुस्तके बदलण्याची, नवीन पुस्तके घेण्याची संधी मिळते. पुस्तक बदलण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी बारकोड यंत्रणा वापरली जात आहे. यामुळे १०,००० हून अधिक विद्यार्थी आणि ५०० शिक्षकांना या ग्रंथालयाचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
--------
कोणती पुस्तके ?
- आत्मचरित्र
- माहितीपर
- अनुवाद
- कथा
- शैक्षणिक
- मनोरंजनात्मक
------------
नवीन काय?
विद्यार्थ्यांना संगणकसाक्षर करता यावे, यासाठी अक्षरभारतीतर्फे ‘ज्युनिअर आर्यभट्ट’ हा प्रकल्प जानेवारीपासून सुरु करण्यात आला आहे. एल अँड टी इन्फोटेकच्या वतीने या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन संगणक ज्ञान दिले जाते. मुंबई आयआयटीचे प्रा. कन्नन एम मौदगल्य यांच्या सहकार्याने २०२० पर्यंत १,००,००० मुलांना संगणकसाक्षर करण्याचे ध्येय बाळगण्यात आले आहे.
- ----------------
शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली तरच भावी पिढीतील वाचक निर्माण होऊ शकतात. मुलांपर्यंत चांंगली पुस्तके पोचल्यास त्यांच्यामध्ये नक्कीच वाचनसंस्कृती जोपासली जाऊ शकते. त्यामुळे फिरत्या ग्रंथालयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला विदयार्थी आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- केदार तापीकर, अक्षरभारती