४० वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती
By admin | Published: May 5, 2017 02:14 AM2017-05-05T02:14:36+5:302017-05-05T02:14:36+5:30
बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची
मोरगाव : बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. यामुळे मुर्टी (ता. बारामती) येथे अंध नामदेव अप्पा कारंडे यांनी पाण्यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मुर्टी, मोराळवाडी, मोढवे, मोरगाव, तरडोली, आंबी, लोणी भापकर, जळगाव कडेपठार, ढाकाळे, मुढाळे, माळवाडी, जळगाव, भिलारवाडी, सायंबाचीवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा ही कायम दुष्काळी गावे आहेत.
या गावांतील जमीन बहुतांश काळी, कसदार असूनही शेतकरी पाण्याअभावी देशोधडीला लागला आहे. जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले नामदेव कारंडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांना त्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कारंडे यांनी सांगितले, की वर्षातील दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडी असलेली कऱ्हा नदी व आठ महिन्यांपेक्षा अधीक काळ वाहणारी नीरा नदी यांचा जोड प्रकल्प राबविल्यास येथील शेतीला पाणी मिळेल. तसेच, तालुक्यातील बहुतांश खेडेगावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही. मुर्टी येथे चांगले बसस्थानक बांधावे, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना योग्य मानधन द्यावे.
मुर्टी येथे पोलीस मदत केंद्र
व्हावे, गुंजवणी धरणातील पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी मिळावे, पुरंदर उपसा योजना शासनामार्फत १२ महिने कार्यान्वित ठेवावी,
मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशा वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी कारंडे यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी (दि. ३) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी नामदेव कारंडे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
(वार्ताहर)
आरोग्य तपासणी करू देणार नाही : कारंडे
दरम्यान, मुर्टी आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. जोपर्यंत आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होत नाही. तोपर्यंत मी माझी वैद्यकीय तपासणी करू देणार नाही, असेही कारंडे यांनी सांगितले. यापूर्वीही कारंडे यांनी आॅक्टोबर २०१३मध्ये जिरायती भागातील गावांसाठी ६ दिवस उपोषण केले होते.
दुसऱ्यांदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तप्त उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा एक घोट जरी मिळाला नाही, तरी पशुपक्ष्यांसह मनुष्य कासावीस होतो. मात्र, अशा दिवसांत कारंडे यांच्या उपोषणामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.