वानखेडेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, आज होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:24 AM2019-01-09T01:24:12+5:302019-01-09T01:24:35+5:30
आज होणार निर्णय : वकिलाने १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण
पुणे : जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अॅड. रोहित शेंडे याला २६ डिसेंबर रोजी एक कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याबाबत विभागाने यापूर्वी वानखेडे यांच्याकडे चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी शेंडे यांच्याशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर विभागाने वानखेडे यांच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून ज्या संगणकावर हा तयार करण्यात आला त्या संगणकासह वानखेडे यांच्या कार्यालयातील अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अॅड. शेंडे आणि वानखेडे यांच्यातील मोबाइलवरील संभाषणही मिळविण्यात आले आहे. त्यावरून या प्रकरणात लाच घेण्याचा कट रचल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर ठेवून त्यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विभागाने कट रचण्यात सहभागी असल्याचे १२०(बी) हे कलम लावले आहे. त्यामुळे अॅड. शेंडे आणि वानखेडे यांनी लाच घेण्याचा कट रचल्याचे स्पष्ट होते. या दोघांव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीचा या प्रकरणात समावेश असल्याचा विभागाला संशय असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक काय निकाल देणार आहेत त्याची प्रत अॅड. शेंडे याने निर्णय होण्याच्या आधीच तक्रारदाराला व्हॉट्सॅअपद्वारे पाठविली होती, असे तपासातून पुढे आले आहे. वानखेडे यांच्या अर्जावर आज (बुधवार) निर्णय होणार आहे.
वानखेडे रुग्णालयात दाखल :
अॅड. शेंडे याला अटक केल्यानंतर काही दिवसांपासून वानखेडे अज्ञात स्थळी गेले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला असून अस्वस्थ असल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाले होते.
पुराव्यामध्ये छेडछाड करायची नाही, १४ जानेवारीपर्यंत एसीबी कार्यालयात दररोज हजेरी लावायची, खटल्याचा निकाल लागेपर्यंत न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे जिल्ह्याबाहेर जायचे नाही, अशा अटींवर अॅड. शेंडे याला विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि अॅड. सुहास कोल्हे यांनी काम पाहिले.
- अॅड. शेंडे