IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:56 PM2024-07-09T12:56:15+5:302024-07-09T12:56:59+5:30
प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली होती
किरण शिंदे
पुणे : पूजा खेडकर.. २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी.. सध्या या मॅडमची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात चर्चा सुरू आहे ती यांच्या चमकोगिरीची. आणि याच चमकोगिरीच्या हव्यासापाई त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.. म्हणजे मॅडमना पुण्याहून थेट वाशीमलाच पाठवण्यात आलय. नेमकं काय झालं.. चमकोगिरीच्या नादात स्वतःच हस आणि बदली करवून घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) नेमक्या आहेत तरी कोण?
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो.. जिल्ह्याचे कामकाज कसं चालतं याची माहिती त्यांना घ्यावी लागते.. वेगवेगळ्या विभागात काम करावं लागतं.. आणि या कामाचा अनुभव आल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येते.. मात्र नुकत्याच आयएएस झालेल्या पूजा खेडकर यांची बात काही औरच.. कारण प्रोबेशन पीरियड सुरू असतानाच या मॅडमला गाडी बंगला आणि दिमतीला शिपाई पाहिजे.. मात्र नव्यानेच अधिकारी झालेल्या या मॅडमना जुन्या जाणत्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावूनही पाहिलं.. मात्र तरीही मॅडमचा रुबाब काही कमी होईनाच.. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ पानांचं पत्र लिहीत थेट या मॅडमची मंत्रालयात तक्रार केली.. तक्रारीची खातरजमा करण्यात आली.. आणि त्यानंतर मॅडमची बदली पुणे जिल्ह्यातून थेट वाशिम जिल्ह्यात करण्यात आली..
मॅडम होत्या प्रोबेशन पिरियडवर मात्र रुबाब त्यांचा अधिकाऱ्याचा असायचा..या मॅडमचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत.. खरंतर कोणत्याही खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावता येत नाही.. परंतु पुणे जिल्ह्यातील कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू होताच मॅडमनी आपल्या खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला.. एकच नाही तर या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला.. हा दिवा दिवसाही सुरूच असायचा.. जिल्हाधिकारी कार्यालयात उभी असणारी ही आलिशान गाडी पाहून हे अधिकारी कोण अशी चर्चा व्हायची.. हे तर काहीच नाही या मॅडमनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयातील अँटी चेंबरवरच कब्जा मारला.. म्हणजे हे वरिष्ठ अधिकारी शासकीय कामानिमित्त मुंबईत गेले होते.. हीच संधी साधून या मॅडमनी अँटीचेबरमधील त्यांचं सामान बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी स्वतःचं कार्यालय थांटलं.. इतकच नाही तर स्वतःच्या नावाचा बोर्ड सुद्धा लावला होता.. दरम्यान मुंबईतून परत आल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली.. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यालय त्यांना परत द्या असं या मॅडमला सांगितलं.. त्यावर या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांनाच व्हाट्सअप मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचं म्हटलय..अर्थात हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे..
प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली.. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली.. बरं जे ऑफिस दिलं होतं ते ऑफिस या मॅडमनी नाकारलं.. हे कमी की काय या मॅडमचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात.. माझ्या मुलीला त्रास दिला तर भविष्यात तुम्हाला त्रास होईल अशी धमकी देतात.. तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्याएवढी पोस्ट मिळणार नाही असं म्हणत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात..असही या तक्रार अर्जात म्हटलं आहे..
खरंतर पूजा खेडकर या जून महिन्यातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या होत्या.. मात्र या महिनाभरात त्यांच्या अवास्तव मागण्यांनी अधिकारी पुरते हैराण झाले होते.. त्याची खमंग चर्चाही रंगली होती.. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच प्रोव्हेशनवर असणाऱ्या पूजा खेडकर यांची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही म्हणत तक्रार केली होती.. आणि त्या तक्रारीची दखल घेत खेडकरांची तडकाफडकी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे..