Eco Friendly Ganpati: पर्यावरणपूरक गणपती बाप्पा घ्यायचे आहे; पण ते मिळतात कुठे? माहिती एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:25 PM2024-08-28T13:25:41+5:302024-08-28T13:27:07+5:30
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इको बाप्पा हे मोबाइल ॲप विकसित केले
पुणे : पर्यावरणपूरक गणराय घ्यायचे आहे; पण ते मिळतात कुठे? बनवते कोण, असा प्रश्न पडलाय का? आता ही माहिती एका क्लीकवर मिळणार आहे. तुमच्या परिसरात पर्यावरणपूरक इको बाप्पा कुठे मिळतील, त्या शिल्पकाराचे नाव, त्यांचा पत्ताही मिळत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याविषयीचे ‘इको बाप्पा’ हे ॲप सुरू केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणरायाला चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इको बाप्पा हे मोबाइल ॲप विकसित केले. या मोबाइल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य होणार आहे.
‘एमपीसीबी’ने राज्यातील अशा शिल्पकारांचे सादरीकरण घेतले. त्यानंतर ‘इको बाप्पा’ ॲप तयार करण्यात आले आहे. मुख्यत्वे शाडू माती आणि इतर साहित्यापासून गणेशमूर्ती बनवणाऱ्या राज्यातील सुमारे २५० ते ३०० मूर्तिकारांची या ॲपमध्ये नोंदणी झाली आहे. या ॲपमध्ये मूर्तिकाराचे मोबाइल क्रमांक, ई-मेल पत्ता, त्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीचे छायाचित्र असेल. इच्छुकांनी ॲपवर जाऊन आपली मागणी नोंदवावी लागेल.
काय-काय असणार ॲपमध्ये?
पुणे-मुंबई, नागपूर किंवा तालुका ठिकाणच्या एखाद्या ग्राहकाने इको ॲपवर फोन किंवा ई-मेलद्वारे शिल्पकार शोधल्यास, त्यांना त्यांच्या परिसरात कोणते शिल्पकार उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. तसेच मूर्ती पर्यावरणपूरक असतील, त्याचे विविध प्रकारही ॲपवर मिळत आहे. या मूर्ती कुठे मिळतील, त्यांचे संपर्क क्रमांक आणि पत्ताही आहे.
विनामूल्य डाउनलोड
‘इको बाप्पा’ हा ॲप मोबाइल प्लेस्टोरमधून विनामूल्य डाउनलोड करता येणार असून, यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी, आभूषणे, सजावटीचे साहित्य व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध होणार आहे.