जायचे होते वाईला, तिकिटाच्या घाईने गेला पोलिस स्टेशनला; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 02:27 PM2023-06-16T14:27:06+5:302023-06-16T14:27:14+5:30
पीएमपीची पिंपरी आगाराची चिंचवड ते कात्रज ही बस दुपारी तीनच्या दरम्यान कात्रजकडे जात असताना थेरगाव फाटा येथील स्टॉपवर थांंबली...
पिंपरी : सातवर्षीय मोहित आपल्या आजीला भेटण्यासाठी वाई (जि. सातारा) येथे घरच्यांना न सांगता जायला निघाला. थेरगाव येथील पीएमपी बस थांब्यावरून बसमध्ये बसला. पीएमपीच्या वाहकाला त्याने वाईचे तिकीट मागितले. त्यामुळे वाहकाला शंका आली. वाहकाने विश्वासात घेऊन त्या मुलाकडून त्याची माहिती विचारली. तो घरातून पळून आल्याचे लक्षात येताच त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून ताब्यात देण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १०) घडली.
पीएमपीची पिंपरी आगाराची चिंचवड ते कात्रज ही बस दुपारी तीनच्या दरम्यान कात्रजकडे जात असताना थेरगाव फाटा येथील स्टॉपवर थांंबली. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी सात वर्षांचा मोहित जाधव बसमध्ये बसला. वाहक धनाजी साठे यांनी त्याला कुठे जायचे विचारले असता, त्याला वाईला जायचे असे त्याने सांगितले. त्यामुळे साठे यांना शंका आली. त्यांनी जवळच्या वाकड पोलिसांना कळवले. बस थांबवली त्या ठिकाणी दहा मिनिटांत पोलिस दाखल झाले. मोहितची बॅग तपासली असता त्याच्या आजीचा संपर्क क्रमांक मिळवला. आजीशी संपर्क केल्यानंतर त्याची ओळख पटली.
दोन दिवसांपूर्वीच त्याने बॅग भरली..
मोहित सुट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत आजीला भेटण्यासाठी गावी वाईला (जि. सातारा) गेला होता. तिथे महिनाभर राहिल्याने त्याचे मन रमले. शाळा सुरू झाल्याने शाळेत जावे लागणार याची भीती त्याला होती. त्यामुळे त्याने गावी जायचे ठरवले. त्यासाठी त्याने दोन दिवस आधीच तयारी करत बॅग भरली. भरलेली बॅग कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून त्याने गॅलरीमध्ये लपवून ठेवली.
तिकीट विचारणा करत असताना मोहित विनातिकीट आढळल्याने तो एकटा आहे, हे लक्षात आले. त्याची बॅग तपासून त्याच्या आजीला कळवले. १०० नंबरला फोन करून पोलिसांना कळवले. नंतर त्याने वडिलांचा पाठ असलेला नंबर सांगितला. पोलिसांनी त्याला आई-वडिलांकडे सुखरूप सोपविले.
- धनाजी साठे, वाहक, पीएमपीएल
मोहित एकटा गावी जाईल, याची कल्पना आम्ही केली नव्हती. तो बाहेर खेळतोय, असे आम्हाला वाटले. परंतु, पोलिसांचा फोन आल्याने आमची धांदल उडाली. एकुलता एक मुलगा असल्याने तो सापडला याचा आम्हाला खूप आनंद झाला. वाहक आणि पोलिसांची मदत आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
- चारुशीला जाधव, मोहितची आई