प्रभाग समिती हॉलला ठोकले टाळे; बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:37 PM2018-01-24T13:37:38+5:302018-01-24T13:38:22+5:30
भाजपाच्या बिबवेवाडी भागातील सर्व नगरसेवकांनी आज प्रभाग समितीची बैठक न घेता प्रभाग समितीच्या हॉलला टाळे ठोकून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.
बिबवेवाडी : बिबवेवाडी भागातील पुणे महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण शाळेच्या जागेमध्ये सरू करण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचा ठेकेदाराचा करार संपला असताना २० नोंव्हेबर २०१७ पासून बेकायदा वसुली केली जात आहे. तसेच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तिनही प्रभागात मुख्य खात्याचे अधिकारी काम करीत नाहीत, यासाठी भाजपाच्या या भागातील सर्व नगरसेवकांनी आज प्रभाग समितीची बैठक न घेता प्रभाग समितीच्या हॉलला टाळे ठोकून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.
माजी नगरसेविका अस्मिता शिंदे यांच्या संकल्पनेतून हा बॅडमिंटन हॉल या ठिकाणी बांधण्यात आला होता. पालिकेच्या शाळेची जागा वापरल्यामुळे व ही इमारत पालिकेच्या पैशातून होत असल्यामुळे येथील शाळेतील विद्यार्थांना हा हॉल मोफत खेळण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी प्रत्येकाकडुन पैशाची वसुली केली जात आहे. स्थानिक नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सुरुवातीपासूनच हा हॉल बांधताना याच्या हेतू विषयी संशय व्यक्त केला होता. मात्र आमदार माधुरी मिसाळ यांनी मध्यस्थी करून येथील विद्यार्थांना चार तास मोफत हा हॉल मोफत दिला जाईल, असे अधिकाऱ्यांकडुन वदवून घेतले होते. मात्र तसे काही घडले नाही.
स्थानिक नगरसेवकांचा विरोध डावलत आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या अधिकारात हा हॉल ११ महिन्यासाठी ठेकेदार पद्धतीने चालवण्यास दिला. हा ठेका २० नोव्हेंबर २०१७ रोजी संपला देखील, मात्र येथील ठेकेदार अजूनही वसुली करीत आहेत. अधिकारी अर्थपूर्ण संबधामुळे याचे टेंडर लावत नाहीत असा आरोप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केला आहे. शिळीमकर यांनी येथील ठेकेदाराने बेकायदा वसुली केली असल्यामुळे त्यांच्यावर व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शिळीमकर यांनी सांगितले, की इंदिरानगर भागात बेकायदा मटन दुकाने उघडली आहेत. यामुळे येथे कापलेल्या जनावराचे रक्त व चमडी ड्रेनेजच्या लाईनमध्ये टाकली जात आहे. या विषयी देखील पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी कारवाई करीत नाहीत या विरोधात आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत.
या आंदोलनात प्रभाग समिती अध्यक्षा मानसी देशपांडे, प्रवीण चोरबेले, रुपाली धावडे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, अनुसया चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.
सत्ताधारी असून होत नाहीत कामे
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक २८, ३६ व ३७ हे प्रभाग येतात. या तिनही प्रभागात मिळून भाजपचे ११ तर शिवसेनेचा १ नगरसेवक आहे. या प्रभाग समितीमध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, आमदार माधुरी मिसाळ यांच्या ननंद मानसी देशपांडे असे सत्ताधारी नगरसेवक आहेत. पालिकेत, राज्यात व देशात देखील भाजपची सत्ता आहे. तरीही पालिका अधिकारी येथील कामे करत नाहीत. सत्ताधारी नगरसेवकांना अशा प्रकारे आंदोलने करण्याची गरज भासत आहे, त्यामुळे भागात वेगळी चर्चा रंगत आहे. अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना काही आक्रमक निर्णय घेणे आवश्यक आहे.