प्रभाग समित्यांमध्येही भाजपाचीच सरशी, गिरीश बापट यांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:27 AM2018-04-17T03:27:39+5:302018-04-17T03:27:39+5:30
महापालिकेच्या १५ पैकी ११ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीला मिळाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या निकटच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देत महापालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवले.
पुणे : महापालिकेच्या १५ पैकी ११ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीला मिळाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या निकटच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देत महापालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवले. ३ समित्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, तर एका समितीत सत्ताधारी व विरोधकांचे बलाबल समान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली व ती समिती काँग्रेसच्या पदरात पडली.
१५ प्रभाग समित्यांपैकी ९ समित्या आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यात बापट यांनी आपल्या निकटच्या नगरसेवकांना संधी दिली होती. ६ समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यातही बापट यांनी अध्यक्षपदी आपले नगरसेवक येतील याची काळजी घेतली. त्यामुळे आता महापालिकेतील भाजपाच्या तथाकथित दुसºया गटाचे अस्तित्व केवळ नावालाच राहिले आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदांसाठी झालेल्या निवडणुकीतही बापट यांच्याच समर्थकांची निवड झाली. त्यामुळे अध्यक्षपदही त्यांच्याच समर्थकाकडे आले. एकूण ११ समित्यांचे अध्यक्षपद भाजपाला मिळाले.
तीन समित्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीत भाजपा व विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सदस्य संख्या समान झाली. त्यामुळे तिथे चिठ्ठी काढण्यात आली. त्यात काँग्रेसच्या लता राजगुरू यांचे नाव निघाले.
महापालिकेच्या १५ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यात ११ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार निवडून आल, तर राष्ट्रवादी काँगे्रसला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
हे झाले प्रभाग समित्यांचे अध्यक्ष
आंैैध बाणेर क्षेत्रीय कार्यालय- अमोल बालवडकर (भाजपा), शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय- स्वाती लोखंडे (भाजपा), सिंहगड क्षेत्रीय कार्यालय- अनिता कदम (भाजपा), कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय- वीरसेन जगताप (भाजपा), कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय- योगेश समेळ (भाजपा), बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय- रूपाली धाडवे (भाजपा), येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय- अनिल टिंगरे (भाजपा), कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय- अल्पना वरपे (भाजपा), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय-दीपक पोटे (भाजपा), भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय- मनीषा लडकत (भाजपा), वडगावशेरी नगर रोड क्षेत्रीय कार्यालय- श्वेता खोसे गलांडे (भाजपा).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांची नावे
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय- पठाण अब्दुल गफूर अहमद (राष्ट्रवादी काँगे्रस), धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय- बाळासाहेब धकनवडे (राष्ट्रवादी काँगे्रस), हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय- हेमलता मगर (राष्ट्रवादी काँगे्रस), ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय- लता राजगुरू (काँगे्रस).