‘मारामारी’ने वीर यात्रेची सांगता

By Admin | Published: February 22, 2017 02:00 AM2017-02-22T02:00:12+5:302017-02-22T02:00:12+5:30

श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरीच्या १३ दिवसांच्या यात्रेची सांगता

'Warfare' tells of Veer Yatra | ‘मारामारी’ने वीर यात्रेची सांगता

‘मारामारी’ने वीर यात्रेची सांगता

googlenewsNext

सासवड : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरीच्या १३ दिवसांच्या यात्रेची सांगता मंगळवारी (दि. २१) पारंपरिक ‘मारामारी’ (रंगाचे शिंपण)ने झाली. या प्रसंगी सुमारे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याच्या मुक्तउधळणीत ‘सवाई सर्जाचं चांगभल’, ‘नाथसाहेबांचं चांगभल’च्या गजराने वीर परिसर दणाणून गेला होता.
शुक्रवारी (दि. १०) माघ शु. पौर्णिमेला वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा व त्यानिमित्त दहा दिवस यात्रा सोहळा सुरू होता. आज माघ वद्य दशमी मंगळवार (दि. २१) हा यात्रेचा मुख्य दिवस व पारंपरिक मारामारीने यात्रेची सांगता झाली. दरम्यान, गुरुवारी रात्री १ वाजता देऊळवाड्यात छबिन्याला सुरुवात झाली. मानाच्या सर्व पालख्या, काठ्यांसह पहाटे देवाचे मानकरी अप्पा शिंगाडे यांची भाकणूक झाली.
त्यानंतर पहाटे छबिन्याची सांगता झाली. मंगळवारी (दि. २१) दु. १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दु. १ वाजता देवाचे मानकरी दादा बुरुंगुले व तात्या बुरुंगुले यांची अंगात देव संचारला व वार्षिक पिकपाण्याची भाकणूक झाली. ‘मृगाचे पाणी दोन खंडांत, आर्द्रेचा पाऊस ४ खंडांत पडेल. उत्तरा आणि पूर्वा ४ खंडांत तर आश्लेषा आणि मघा दोन खंडांत पडेल. गुराढोरांना रोगराई होणार नाही, हस्ताचा पाऊसही ४ खंडांत पडेल,’ अशी भविष्यवाणी झाली आणि भाविकांनी ‘श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं’चा जयजयकार करीत गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण केली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, देवाचे मानकरी, वीर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक नियोजनातून हा सोहळा उत्तमरीत्या संपन्न झाला. भाविकांना पिण्याचे पाणी, विद्युत मनोरे उभारून प्रकाशव्यवस्था, रुग्णवाहिका व सासवड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय पथकाची व्यवस्था केली होती. गॅस सिलिंडर वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. मंदिर व परिसरात ३० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण, वाहन पार्किंगसाठी मैदान आरक्षित, सासवड पोलिस ठाण्याबरोबरच ग्रामसुरक्षा दलाच्या मंडळींचा बंदोबस्त, जादा एसटी गाड्यांची व्यवस्था आदी सुविधांबद्दल तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सासवड व जेजुरी नगर परिषद, बांधकाम विभाग, विद्युत वितरण कंपनी, पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सर्व शासकीय विभागांचे तसेच भाविकांनी केलेल्या सहकार्याबद्दल ट्रस्ट व ग्रामस्थांनी आभार मानले.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन माधवराव ऊर्फ बाळासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, तसेच दत्तात्रय धुमाळ, दिलीप धुमाळ, बबन धसाडे, नामदेव जाधव, ज्ञानेश्वर धुमाळ, अशोक वचकल, सुभाष समगीर ही विश्वस्त मंडळी व सचिव तय्यद मुलाणी, सरपंच मालन चवरे, उपसरपंच प्रतापराव धुमाळ, ग्रामसेविका सुजाता पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ, देवाचे मानकरी, सालकरी, पुजारी, याचबरोबर कोडीतसह सर्व पालख्यांचे व यात्रेचे चोख नियोजन केले.

हेलिकॉप्टरमधून मंदिर व परिसरावर पुष्पवृष्टी

दुपारी १.३० वाजता देवाचे मानकरी भारत जमदाडे व जमदाडे परिवाराकडून रंगाचे शिंपण करण्यात आले. या वेळी कुंजीरवाडीचे विशाल धुमाळ आणि पुण्याचे आनंद शिंगाडे यांच्या वतीने देण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमधून देवस्थानाच्या वतीने मंदिर व परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सर्व पालख्या, काठ्यांची एक मंदिरप्रदक्षिणा होऊन दु. २ वाजता सर्व लवाजमा देऊळवाड्याबाहेर पडून पारंपरिक मारामारीने या १० दिवसांच्या यात्रा सोहळ्याची सांगता झाली. दिवसभरात सुमारे ५ लाख भाविकांनी उपस्थित दाखविली.

Web Title: 'Warfare' tells of Veer Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.