वारी समाज व देशनिर्मितीसाठी पाठशाला - डॉ. मुकुंद दातार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 12:12 AM2018-07-08T00:12:22+5:302018-07-08T00:22:56+5:30
वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी नवस करायला किंवा नवस फेडायला जात नाहीत. तसेच काही तरी फायदा व्हावा म्हणून पंढरीची वारी करत नाहीत. तर सासरी गेलेली लेक आपल्या माहेरी जाते, त्याच भावनेतून पंढरपूरच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी जातात.
वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी नवस करायला किंवा नवस फेडायला जात नाहीत. तसेच काही तरी फायदा व्हावा म्हणून पंढरीची वारी करत नाहीत. तर सासरी गेलेली लेक आपल्या माहेरी जाते, त्याच भावनेतून पंढरपूरच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी जातात. वारीत सहभागी झालेला माणूस हा माणसासारखा वागतो. त्यामुळे वारी ही समाज व देशनिर्मितीसाठी पाठशाला आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद दातार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वरमहाराज हे वारकरी संप्रदायासाठी माऊली आहेत. ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर वारकरी संप्रदाय आधारित आहे. वारकरी संप्रदायाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवधर्म शिकवला. त्यामुळेच महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी व जातीच्या पलीकडे विचार करणारी आहे. तसेच पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी जात-धर्म विसरून प्रत्येक वारकऱ्याबरोबर आदरभावनेतून संवाद साधतात. वारीत कोणाचा धक्का लागला तर वाद घालत नाहीत.
वारीला ७00 वर्षांची परंपरा असून, संत ज्ञानेश्वरमहाराज यांचे वडीलसुद्धा वारीला जात होते. त्याच्यप्रमाणे संत ज्ञानेश्वर व तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्यालाही सुमारे २00 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दिवसेंदिवस वारीमध्ये सहभागी होणाºया वारकºयांची संख्या वाढत आहे. केवळ ग्रामीण भागातील शेतकरीच नाही तर शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच आयटी क्षेत्रात काम करणारे तरुणही वारीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट असून, त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे आपणाला पाहायला मिळतात. हरित वारी, निर्मल वारी अशा नवनवीन उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकºयाला निसर्गाच्या रक्षणाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व अधिक लक्षात येते. तसेच शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून गावोगावी विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. एकूणच वारीतून समाजसेवेची भावना निर्माण होते, असे दातार यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून संत ज्ञानेश्वर अध्यासन कार्यरत आहे. धुंडामहाराज देगलूरकर आणि वरदानंद भारती यांनी व त्यांच्या सहकाºयांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराज अध्यासनाची स्थापना झाली. ज्ञानेश्वर महाराजांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठातील मराठी, संस्कृत, प्राकृत, मानसशास्त्र या विभागांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वर्ग चालविले जात आहेत. ज्ञानेश्वरांचे चिद्विलास वादाचे तत्त्वज्ञान शहरात व शहराबाहेर बहि:शाल प्रबोधन वर्ग घेऊन तरुण पिढीपर्यंत पोहोचविले जात आहे.
‘विद्यापीठ हे लोकपीठ व्हावे’ या विचारातून अध्यासनाच्या माध्यमातून पुढील काळात काम केले जाईल, असे नमूद करून दातार म्हणाले, केवळ व्याख्यानच नाही तर संत साहित्यविषयक अध्यासनात संशोधन सुरू आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराममहाराज यांच्यापर्यंतच्या संतांनी लिहिलेल्या रचनांमधील काही शब्दांचे अर्थ आजच्या तरुण पिढीला समजत नाहीत. त्यामुळे मध्ययुगीन मराठी वेचक शब्दकोश तयार केला जात आहे. हा शब्दकोश तब्बल १0 हजार शब्दांचा असणार आहे.
संत साहित्यावरील व्याखानांबरोबरच त्यांचे विचार ग्रंथरूपात यायला हवेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संत साहित्यावरील पीएच.डी. करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पीएच.डी.च्या प्रबंधामधून पूर्वीच्या ज्ञानात भर घालणारे संशोधन केले पाहिजे, याकडे लक्ष दिले जात आहे. वारीतून मानवतेचे शिक्षण मिळते, त्यामुळे चांगला समाज व देशनिर्मितीसाठी वारीचे महत्त्व मोठे आहे, असेही दातार यांनी सांगितले.