वारकरीसेवा अन्नदानापुरतीच, सुविधांचा अभावच

By admin | Published: July 1, 2016 01:19 AM2016-07-01T01:19:30+5:302016-07-02T12:50:34+5:30

भक्तिरसात चिंब होऊन पुणेकर वारकरीसेवा करतात, मात्र ती केवळ खाण्या-पिण्यापुरतीच.

Warkarasevaanadanapurette, lack of facilities | वारकरीसेवा अन्नदानापुरतीच, सुविधांचा अभावच

वारकरीसेवा अन्नदानापुरतीच, सुविधांचा अभावच

Next


पुणे : भक्तिरसात चिंब होऊन पुणेकर वारकरीसेवा करतात, मात्र ती केवळ खाण्या-पिण्यापुरतीच. अन्नदानाशिवाय इतर जबाबदारी घेण्यात पुणेकर कमी पडत असल्याने बुधवारच्या रात्री हजारो वारकरी महिलांना रस्त्यावरच रात्र काढावी लागल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले.
पांडुरंगाच्या दर्शनाच्या आसेने भक्तीचा मळा फुलवित पंढरीकडे निघालेल्या वारकरी माऊली कोणत्याही अडथळ्याची पर्वा करत नाहीत. सोई-सुविधा त्यांच्यासाठी गौण. परंतु, पुण्यासारख्या शहरात निवारा, स्वच्छतागृहे आणि अंघोळीची व्यवस्था मात्र काहीही नव्हती. राज्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या हजारो महिलांनी फुटपाथवर रात्र काढली. एका महिलेने पहाऱ्याप्रमाणे जागे राहायचे आणि इतरांनी झोपायचे असे करावे लागले. काही शाळांमध्ये सोय करण्यात आली होती. मात्र, त्यांची संख्या अगदीच कमी होती.
श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्या आळंदी, पिंपरीचा मोठा टप्पा ओलांडून थकून भागून महिला वारकरी रात्री पासोड्या विठोबा, दक्षिणमुखी मारुती मंदिर, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर तसेच नाना पेठ, लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ आदी ठिकाणी दुकानांच्या पायऱ्यांवर विसावल्या... थकलेल्या असल्यामुळे पडल्या पडल्या झोप लागेल अशी अवस्था... पण, त्यांच्या काही डोळ्याला डोळा लागेना... ‘अजून झोपला नाहीत का?’ असे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी विचारल्यावर त्यांनी सुरुवातीला प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि गैैरसोयीची भावना व्यक्त करत ‘आमची सुरक्षा पांडुरंगाच्या हाती’ असा विश्वासही व्यक्त केला.
राज्याच्या विविध भागांतून वारीत सहभागी झालेले महिला आणि पुरुष वारकरी रात्री विविध भागांमध्ये विसाव्याला थांबले. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मध्यवर्ती भागात पाहणी केली असता, महिला वारकरी दुकानांच्या पायऱ्यांवर अथवा जागा मिळेल तिथे पहुडलेल्या दिसल्या. पार्वताबाई २५ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. त्या म्हणाल्या, ‘‘पुण्यात आल्यावरच राहण्याची थोडीफार गैैरसोय होते. शाळा, मंदिरे अशा ठिकाणी
सर्वांना जागा मिळेलच असे नाही.
मग, रस्त्याकडेला विसावा घ्यावा लागतो. पुण्यातून बाहेर पडल्यावर सासवड, जेजुरी अशा टप्प्यांवर
गैैरसोय होत नाही.
>प्रात:र्विधीचे काय? : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी
रात्रीच्या वेळी दुकानांच्या, इमारतींच्या पाय-यांवर स्थिरावल्यावर बरेचदा महिलांना स्वच्छतागृहांची गरज भासते. जवळपास सार्वजनिक शौैचालय अथवा आडोसा असेल तर पटकन जाता येते. मात्र, अशी सोय नसेल आणि खूप रात्र झाली असेल, तर महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे, बरेचदा पोटदुखीसारख्या समस्या उदभवतात.
>अंघोळीसाठी लगबग
दिंड्यांमध्ये पुरुष आणि महिला यांचा एकत्र समूह असतो. पहाटे पुरुष उठण्याआधी चारच्या दरम्यान उठून महिला पटापट अंघोळ उरकून घेतात. मैैलायुक्त पाण्याने अंघोळ करण्याची परिस्थिती ओढावल्याचे अनुभवही या वेळी महिलांनी सांगितले. रात्री कमीतकमी आहार घ्यायचा, शक्यतो रात्री-अपरात्री स्वच्छतागृहात जायची वेळ ओढवून घ्यायची नाही, सोय नसेल तर अंघोळ न करताच पुढच्या प्रवासाला निघायचे, अशीही तडजोड करावी लागत असल्याचे त्या म्हणाल्या.
>निवासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता
ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्यावर त्यांच्यासाठी विविध मंडळांतर्फे पोहे, केळी, राजगिरा लाडू, पाण्याच्या बाटल्या आदींचे वाटप केले. मात्र, महिला वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी कोणीही स्वयंस्फूर्तीने पुढे न आल्याची बाब ‘लोकमत पाहणी’तून समोर आली.
महिला वारकरी संपूर्ण वारीमध्ये पांडुरंगावर पूर्ण श्रद्धा ठेवून दाखल होतात. ‘त्याचा कृपाशीर्वाद’ असल्याने २०-२५ वर्षांच्या काळात वारीमध्ये छेडछाड, असुरक्षितता, फसवणूक असे अनुभव आले नसल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.
एका दिंडीसाठी पासोड्या विठोबा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तालमीत निवासाची व्यवस्था केली होती. मात्र, मागील वर्षी वारकऱ्यांनी हा परिसर बेशिस्तीने वापरल्याने आणि गलिच्छ केल्याने यंदा तालमीची जागा दिंड्यांना उपलब्ध करून दिली नाही. दिंडीप्रमुखांना ही परिस्थिती माहीत होती; मात्र येथे पोहोचल्यानंतर ही गैैरसोय कळाली, असे कमला अरगळे म्हणाल्या.
शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय केलेली आहे. मात्र, खासगी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही या शाळा वारकरीसेवेत दाखल न झालेल्या पाहायला मिळाल्या. रमणबाग, नूमवि, हुजूरपागा आदी शाळांच्या जागा उपलब्ध झाल्यास वारकऱ्यांची गैैरसोय टळू शकेल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
शनिवार पेठेमध्ये बीड, परभणी येथून आलेल्या काही दिंड्या थांबल्या होत्या. येथे बहुतेक महिला वारकरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाड्यांच्या मागे जागा मिळेल तिथे झोपल्या होत्या. लक्ष्मी रस्ता, शालगर चौक, तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इमारतीमध्ये वारकऱ्यांची सोय करण्यात आली होती. पण येथे पुरेशी जागा नसल्याने
बहुतेक महिला फुटपाथवरच झोपल्या होत्या. लक्ष्मी रोडवर बहुतेक सर्व इमारतींच्या पार्किंगमध्ये वारकऱ्यांनी आसरा घेतला होता.लक्ष्मी रोडवर बीड जिल्ह्यातील एका दिंडीतील सुमारे २५० ते ३०० वारकरी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह थांबले होते. परंतु येथील महापालिकेच्या शाळांमध्ये जागा नसल्याने त्यांनी रस्त्यांच्या कडेला आपल्या गाड्या लावून फुटपाथवरच झोपण्यासाठी आसरा घेतला. या दिंडीत १५०पेक्षा अधिक महिलाच आहेत. रात्र कशी तरी निघाली, पण सकाळी उठल्यावर अंघोळीची मोठी अडचण झाल्याचे या दिंडीतील महिलांनी सांगितले.मंगळवार पेठ येथील बाबूराव सणस कन्या शाळेमध्ये अनेक दिंड्यांची सोय करण्यात आली, पण येथे काही दिंड्यांना चौथ्या मजल्यावर जागा देण्यात आली. एका दिंडीतील काही महिलांनी सांगितले, की ज्येष्ठ महिलांना इतक्या वर चढणे-उतरण्याचा त्रास झाला. यामुळे शाळेच्या आवारत राहुट्या टाकून खालीच सोय केली. पण रिमझिम पावसामुळे चिखल झाला आहे.पालिकेच्या सर्व शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय केलेली आहे. मात्र, खासगी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही या शाळा वारकरीसेवेत दाखल न झालेल्या पाहायला मिळाल्या. रमणबाग, नूमवि, हुजूरपागा आदी शाळांच्या जागा उपलब्ध झाल्यास वारकऱ्यांची गैैरसोय टळू शकेल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.सासवडपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिंड्यांमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांना राहुट्या टाकून रात्रीच्या वेळी मुक्काम करता येतो. त्यामुळे हा प्रवास कमी त्रासाचा ठरतो, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.

Web Title: Warkarasevaanadanapurette, lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.