वारकरी रमले पिठलं-भाकरीच्या पाहुणचारात
By Admin | Published: June 22, 2017 07:19 AM2017-06-22T07:19:56+5:302017-06-22T07:19:56+5:30
सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या वेशीवर जाऊन स्वागत केले. विठ्ठल समाज भजनी मंडळाने पालखी सोहळ्याचे अभंग गात स्वागत केले. यानंतर मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चुलीवरील भाकरी व पिठल्याचे भोजन देण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी तब्बल एक लाख भाकरी व एक हजार किलोचे पिठले असे भोजन वारकऱ्यांना दिले. पिठले भाकरीच्या जेवणाची यवतमधील परंपरा अनेक वर्षे जुनी आहे.
पंढरीची दारे आल्यानो संसारा
दिनांचा सोयरा पांडुरंग
वाट पाहे उभा, भेटीची आवडी
कृपाळू तातडी उतावेळा!!
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला. लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून आज सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पंढरीच्या वाटेतील मोठा टप्पा असलेल्या लोणी ते यवत दरम्यान जवळपास २८ किलोमीटर अंतराचा टप्पा पालखी सोहळ्याने ज्ञानोबा - तुकाराम जयघोष करीत पार केला.
हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात पालखी सोहळा प्रवेश करताना दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, प्रांत अधिकारी संजय असावले, तहसीलदार विवेक साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, आप्पासाहेब पवार, तात्यासाहेब ताम्हाणे, तानाजी दिवेकर, पोपटराव ताकवणे, बोरिभडकच्या सरपंच कमल कोळपे, डॉ. अशोक रासगे, माऊली ताकवणे, सुरेश शेळके, गणेश कदम, नितीन दोरगे उपस्थित होते. पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपुर फाटा, जावजी बुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. जावजी बुवाची वाडी येथे पालखी अर्धा तास विश्रांती साठी थांबली होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यानंतर आरती करण्यात आली.
तत्पूर्वी यवत येथे गावाच्या वेशीवर सरपंच राजिया तांबोळी, उपसरपंच समीर दोरगे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, भीमा पाटस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके, नानासाहेब दोरगे, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, सुभाष यादव, प्रकाश दोरगे, दशरथ खुटवड, शंकर दोरगे, कैलास दोरगे, दत्तोबा दोरगे, यांच्यासह ग्रामस्थांनी पालखी सोहक्याचे स्वागत केले.