आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:49 PM2022-07-18T23:49:32+5:302022-07-18T23:50:06+5:30
Alandi : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे घडली.
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास डंपरने (टिप्पर) चिरडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे घडली. अमित विठ्ठलराव देशमुख (वय १९ वर्ष सध्या राहणार विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा, वडगाव चौक, आळंदी. मूळ रा. लिंगा पो. रिसोड, जि. वाशीम) असे अपघातात मृत पावलेल्या तरुण वारकरी विद्यार्थ्याचे नाव आहे.
अमित हा एका खाजगी रिक्षातून वडगाव चौकात उतरून विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळेकडे पायी चालला होता. दरम्यान पाठीमागून एका भरधाव जाणाऱ्या टिप्परने (एम.एच. १२ एच.डी. ४५०६) अमितला जोरदार धडक दिली. मात्र सदर टिप्परचे चाक अमितच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालक हनुमंत नारायण सुरोसे (वय ४२ सध्या राहणार चोविसावाडी, चऱ्होली बुद्रुक ता. हवेली जि. पुणे. मूळ राहणार नवलबाबा वार्ड, पो. पुसद ता. पुसद, जि. यवतमाळ) यांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, मयत अमित देशमुख हे आळंदीत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत होते. मात्र अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने आळंदीत नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रमेश लक्ष्मणराव रणमोडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.