वारकऱ्यांना चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग
By Admin | Published: June 29, 2017 03:29 AM2017-06-29T03:29:26+5:302017-06-29T03:29:26+5:30
‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात
लोकमत न्यूज नेटवर्क
राजेगाव : ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना राजेगाव फार्म ते भिगवण स्टेशन रस्त्यावर चिखलातून आणि साचलेल्या पाण्याच्या डबक्यांतून स्वत:ला सावरत-सावरत वाट शोधावी लागते, हे विदारक चित्र आहे.
राजेगाव-भिगवण स्टेशन रस्त्यावरील पंढरपूरला जाणारा जवळचा रस्ता म्हणून दौंड- भिगवण रस्त्याने शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, इनामगाव, तांदळी याशिवाय जुन्नर तालुक्यातील आळे येथूनही दहा-बारा पालख्या या रस्त्यावरून जात आहेत. परंतु, या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता, वारकऱ्यांना अतिशय बिकट परिस्थितीत वाट तुडवत प्रवास करावा लागत आहे.
अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, पावसामुळे राजेगाव-भिगवण रस्त्यावर शिंग्रोबामाळ परिसरात होळकरओढ्यादरम्यान पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर तळी साचल्याने प्रवाशांना व वारकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण या गावांतील लोकांना भिगवण ही मुख्य बाजारपेठ असल्याने दैनंदिन व्यवहार व आठवडे बाजाराला या रस्त्यावरून भिगवणकडे यावे लागते. या भागात पावसाची रिपरिप सुरू झाली, की रस्त्यावर सर्वत्र चिखलाचा राडा आणि रस्त्यावरील खड्ड्यात पाण्याची तळी साचलेले चित्र पाहायला मिळते.
राजेगाव फार्म चौफुला ते शिंग्रोबामाळादरम्यान ‘रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे प्रवासी, नोकरदार व विद्यार्थी या रस्त्यावरून दररोजचा प्रवास करून मेटाकुटीला आले आहेत. पावसाळा सुरू झाला, की वर पावसाची रिपरिप आणि खाली चिखलाचा राडा व पाण्याची झालेली तळी, यामुळे अनेक प्रवाशांच्या मोटारसायकल घसरून किरकोळ स्वरूपात अपघात झाले. या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याला अगदी लगत बागायती क्षेत्र आहे. जमिनीतील निचऱ्याचे पाणी जायला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चाऱ्या शेतकऱ्यांनी कधीच बुजवून टाकल्या आहेत. या रस्त्यावरून होणारी ओव्हरलोड वाळूवाहतूक त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, आमदार राहुल कुल यांनी राजेगाव येथे एका मेडिकल स्टोअर्सच्या उद्घाटनप्रसंगी या रस्त्याला पाच कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या रस्त्याला प्रत्यक्ष कधी सुरुवात होते, याकडे लक्ष लागले आहे.