वेळूत रंगला कुस्त्यांचा जंगी आखाडा
By admin | Published: April 25, 2016 02:06 AM2016-04-25T02:06:21+5:302016-04-25T02:06:21+5:30
भोर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून यात्रांमध्ये कुस्त्यांचा थरार सुरू असून, रविवारी वेळू गावात कुस्तीशौैकिनांनी डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या कुस्त्या अनुभवल्या.
पुणे : भोर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून यात्रांमध्ये कुस्त्यांचा थरार सुरू असून, रविवारी वेळू गावात कुस्तीशौैकिनांनी डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या कुस्त्या अनुभवल्या. त्यात हिंदकेसरी रोहित पटेल व डबल महाराष्ट्रकेसरी विजय चौैधरी यांच्या उपस्थितीने भर घातली. शेवटची कुस्ती उपमहाराष्ट्रकेसरी महेश मोहळ व योगेश पवार यांच्यात १५ मिनिटे अटीतटीची होऊन अखेर पंचांनी बरोबरीत सोडली.
ग्रामदैैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त रविवारी वेळू येथे निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरला होता. ११ हजारांपासून ते १ लाख ११ हजार १११ रुपयांपर्यंत कुस्त्या झाल्या. सायंकाळी चार वाजता उद्योजक आशिश पारेख यांनी वाद्यांच्या गजरात आखाड्याचे उद्घाटन केले.
अंतिम लढतीच्या अगोदर झालेली ७५ हजारांसाठी झालेली गणेश हिरगुडे व दीपक माने यांच्या कुस्तीने कुस्तीशौैकिनांच्या डोळ्यांचे पारणो फेडले. कुस्ती व्हावी तर अशी अशीच प्रतिक्रिया यानंतर प्रेक्षकांनी दिली. कुस्ती सुरू झाली आणि काही सेकंदातच गणेशने चपळाईने चाल केली आणि आकडी डावावर दीपकला चित केले.
शेवटची मानाची कुस्ती मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलाचा उपमहाराष्ट्रकेसरी महेश मोहळ व काका पवार तालीमचा उपमहाराष्ट्रकेसरी योगेश पवार यांच्यात तब्ब्ल १८ मिनिटे कुस्ती झाली. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. दोघेही उपमहाराष्ट्र केसरी असल्याने या कुस्तीकडे लक्ष लागून होते. दोघेही तुल्यबळ असल्याने डाव करण्यास ऐकमेकांना संधी देत नव्हते. अखेर यात्रा कमिटीचा निर्णय घेऊन कुलदीप कोंडे यांनी ही कुस्ती बरोबरीत सोडविली.
या आखाड्याला नगरसेवक वसंत मोरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, शिवसेना तालुका प्रमुख माऊली शिंदे, रमेश कोंडे, दिलीप यादव, किसन शिंदे, पंचायत समिती सदस्य अमोल पांगारे, आबा घुले, शिवाजी पांगारे आदी मान्यवर उपिस्थत होते. या वेळी यात्रा कमिटीच्या वतीने हिंदकेसरी रोहित पटेल, डबल महाराष्ट्रकेसरी विजय चौधरी, महाराष्ट्र चॅम्पियन संदीप रासकर, अमोल शेडगे व भोर वेल्हा केसरी देवत्तकोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
पहिल्या १६ कुस्त्या झाल्यानंतर शेवटच्या सहा मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली आणि कुस्तीशौैकिनांनी श्वास रोखून धरला. राजेंद्र पांगारे व धनाजी मुजूमले यांच्यात ३१ हजारांसाठी झालेली कुस्ती दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्याने बरोबरीत सोडण्यात आली. त्यानंतर ४१ हजारांसाठी उदय अल्हाट व अमोल पाटील यांच्यातील कुस्तीत उदय अल्हाट यांनी विजय मिळवला. ५१ हजारांसाठी अनिकेत खोपडेला चितपट करीत अभिजित भोसले याने विजय मिळवला. त्यानंतर भूषण शिवतारे व सागर मोहोळ मैैदानात उतरले. ही कुस्ती अटतटीची होणार असे वाटत होते. मात्र काही वेळ दोघे लढल्यानंतर सागर मोहळच्या पायाला इजा झाल्याने त्याने माघार घेतली आणि भूषण शिवतारेला पंचांनी विजयी घोषित केले.