आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:05+5:302021-06-24T04:09:05+5:30
आरटीई २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देते. मात्र, शिक्षण शुल्क परतावा न मिळाल्याने खासगी शाळांनी यंदा नोंदणी करण्यास ...
आरटीई २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देते. मात्र, शिक्षण शुल्क परतावा न मिळाल्याने खासगी शाळांनी यंदा नोंदणी करण्यास टाळाटाळ केली आहे तर ज्यांनी नोंदणी केली आहे, परंतु त्यांना प्रवेश द्यायला टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, या प्रवेश प्रक्रियेस विलंब होत आहे. असे असले तरी सर्व शाळांची नियमित प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या पालक आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रतीक्षा करायची की एखाद्या शाळेत पाल्यासाठी नियमित प्रवेश घ्यायचा अशा द्विधा मनःस्थितीत आहेत.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि शाळा एकमेकांकडे बोट दाखवत पालकांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे पालक मात्र हवालदिल झाले आहेत. आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुदत ही ११ ते २८ जून आहे. पूर्व हवेलीतील तीन ते चार शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल पंचायत समितीत तक्रारी आल्या आहेत. तशाच तक्रारी उर्वरित भागातूनही आल्या आहेत. हवेली तालुक्यातील १८२ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. यातील एकाही शाळेने प्रवेश नाकारण्याचा प्रयत्न केला तर शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे रामदास वालझडे यांनी सांगितले.