Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: September 2, 2024 05:00 PM2024-09-02T17:00:11+5:302024-09-02T17:02:33+5:30
महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल
पुणे: सध्या राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूर आलेले आहेत. तर हवामान विभागाने मंगळवारी (दि.३) राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, तसेच दोन दिवसांनंतर पाऊस ओसरेल, असाही अंदाज वर्तविला आहे.
राज्यातील मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. येथील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट आहे. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
मंगळवारी (दि.३) आणि बुधवारी (दि.४) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मंगळवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
बुधवारपासून (दि.४) मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल. गुरुवारी (दि.५) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.