मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी १ नोव्हेंबरला मार्केट यार्ड बंदचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:58 PM2023-10-30T20:58:17+5:302023-10-30T20:59:32+5:30
पुणे बाजार समितीचा गुलटेकडी मार्केट यार्ड गेट क्रमांक १ येथील अण्णासाहेब पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखळी उपोषण करणार आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी दिली.....
पुणे : मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेत येत्या बुधवारी (दि.१) ‘मार्केट यार्ड बंद’ पुकारून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेबाजार समितीचा गुलटेकडी मार्केट यार्ड गेट क्रमांक १ येथील अण्णासाहेब पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखळी उपोषण करणार आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी दिली.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पाे पंचायत, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, आदी संघटनांनी पाठिंबा दिला असून, याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन दिले असल्याचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी सांगितले. तसेच फुलबाजार बंद राहणार असल्याची माहिती अखिल पुणे फुलबाजाराचे अध्यक्ष अरुण वीर, फुलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष अप्पा गायकवाड यांनी दिली.
मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि.१) लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. फळे, तरकारी, कांदा-बटाटा विभागातील सर्व अडत्यांसह बाजार घटकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये.
- अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन आणि संचालक, बाजार समिती, पुणे.