वादळामुळे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:47+5:302021-05-17T04:08:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ताैक्ते वादळाचा जिल्ह्यात फारसा फटका बसणार नसला, तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा ...

Warning to the villages at the top of the ghats in the district due to the storm | वादळामुळे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

वादळामुळे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ताैक्ते वादळाचा जिल्ह्यात फारसा फटका बसणार नसला, तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषदेतर्फे घाटमाथ्यावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहे. यासोबतच तत्काळ मदत देण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. गावांत, रस्त्यात वादळी वाऱ्यामुळे घरे किंवा झाडे पडल्यास तत्काळ मदतीसाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक जेसीबी व मजुरांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

कोकण किनारपट्टीवर रविवारी ताैक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा आणि पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाट माथ्यावरील गावांना याचा धोका असल्याने प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्व भागात ढगाळ हवामान व वादळी वारे सुटले होते. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते, तर घरांचे पत्र उडाली. वादळाच्या शक्यतेमुळे ग्रामसेवकांनी गावातच मुख्यालयात राहावे. ज्या शासकीय इमारतींची दुरवस्था झाली आहे किंवा त्यांची छपरे कमकुवत आहे, अशा इमारतीपासून कर्मचाऱ्यांनी लांब राहावे. तसेच, छपरे उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवाव्या जेणेकरून ते वाऱ्याच्या वेगाने उडणार नाहीत. घरे पडल्यास किंवा रस्ते बंद झाल्यास ते लवकर सुरू करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतींनी एका जेसीबीची व्यवस्था करावी. तसेच मजुरांचीही व्यवस्था करावी जेणे करून त्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल.

तत्काळ मदतीसाठी धोकादायक ठिकाणांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्या ठिकाणी मदतीची योग्य व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करून तेथून सर्व परिस्थिती हाताळण्यात यावी. अधिकाऱ्यांची, तसेच सभापतींची वाहने मदत पोहोचवण्यासाठी तयार ठेवली जावी, अशा आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

चौकट

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तयार ठेवा

नागरिकांना प्रथोमोपचार देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रम, उपकेंद्रावर योग्य व्यवस्था करण्यात यावी. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका तयार असाव्या तसेच चालकांनाही तयार ठेवा. कुठल्याही आपात्कलीन परिस्थिती त्या तयार असायला हव्या अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या आहेत.

कोट

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला होता. या वर्षीही तौक्ते वादळामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Warning to the villages at the top of the ghats in the district due to the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.