वारज्यात टोळक्यांचा धुमाकूळ
By admin | Published: June 6, 2016 12:53 AM2016-06-06T00:53:47+5:302016-06-06T00:53:47+5:30
आपसांतील वादामधून दोन टोळक्यांनी वारज्यातील विठ्ठलनगर आणि म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. निरपराध नागरिकांच्या घरांची आणि वाहनांची
कर्वेनगर/वारजे : आपसांतील वादामधून दोन टोळक्यांनी वारज्यातील विठ्ठलनगर आणि म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. निरपराध नागरिकांच्या घरांची आणि वाहनांची तोडफोड करून या टोळक्याने माजवलेल्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांत वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना वाढल्या असून, नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. वारजे पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी सीताराम पिंपरे यांच्या फिर्यादीवरून रोहित पासलकर, मंदार ऊर्फ मन्या जोशी, संकेत शिंदे, अक्षय जाधव यांच्यासह १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दत्तात्रय किसन जोरी (वय ३९, रा. म्हाडा वसाहत) यांच्या फिर्यादीवरून सूरज पिंपरे, नेहाल शिंदे, जावेद पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागामध्ये सध्या पिंपरे आणि पासलकर या दोघांच्या टोळ्या डोके वर काढत आहेत. वर्चस्वाच्या वादामधून या दोन टोळ्यांमध्ये सतत वादविवाद होत असतात. या दोन्ही टोळ्यांमध्ये शनिवारी रात्री पुन्हा वाद झाला होता. पिंपरे आणि त्याच्या टोळीने म्हाडा वसाहतीमध्ये घुसून जोरी यांच्या घरावर दगडफेक करायला सुरुवात केली. बेभान झालेल्या या टोळक्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. मोठमोठ्याा आवाजात शिवीगाळ आणि आरडाओरडा करीत हे टोळके पसार झाले.
त्यानंतर काही वेळातच या घटनेची माहिती पासलकरला मिळाली. त्याने साथीदारांची जमवाजमव केली. विठ्ठलनगर परिसरात घुसलेल्या पासलकरच्या टोळीने हातामध्ये दांडके, कोयते नाचवत आरडाओरडा करीत नागरिकांना शिवीगाळ सुरू केली. तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात करताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पासलकरवर गुन्हे दाखल असून, तो यापूर्वी तडीपारही होता. पिंपरे यांच्या घरासमोरच्या मोटारी, टेम्पोच्या काचा फोडत हे टोळके आरडाओरडा करीत दुचाकीवरून पसार झाले.