लढाईतील योद्धे... कोरोना संकटात पती देशसेवेत अन् पत्नी रुग्णसेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:51 PM2021-06-05T23:51:04+5:302021-06-05T23:54:29+5:30
ऑनफिल्ड ड्युटी : लहान बाळ असतानाही एकही रजा न घेता बजावतात कर्तव्य
हणमंत पाटील
पिंपरी : गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहोत. घरी लहान बाळ असतानाही एकही रजा न घेता अधिपरिचारिका असलेल्या अर्चना खाटमोडे कोरोना योद्ध्या म्हणून रुग्णसेवेत आहेत, तर त्यांचे पती सुशील खाटमोडे हे आर्मीमध्ये अभियंता म्हणून दार्जिलिंग (प. बंगाल) येथे देशसेवेत आहेत. पती-पत्नीच्या प्रामाणिक सेवेच्या निष्ठेला आईवडिलांची साथ व प्रोत्साहन मिळत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवकांना वर्षभरापासून सुटकेचा नि:श्वास घेता आलेला नाही. चऱ्होली (आळंदी) परिसरात राहणारे सुशील व अर्चना खाटमोडे या दाम्पत्यांना दोन लहान मुले आहेत. पती सुशील हे पश्चिम बंगालमध्ये सीमेवर आणि पत्नी अर्चना रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे छोट्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांनी घेतली आहे. अर्चना सकाळपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत आळंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असतात. गेल्या वर्षभरात त्यांनी एकही रजा घेतलेली नाही. या दाम्पत्याने देशावरील कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तव्याला प्राधान्य देऊन रुग्णसेवा आणि देशसेवेला अगदी मनापासून समर्पित केले आहे.
अर्चना म्हणाल्या, “ग्रामीण रुग्णालयात पूर्वीपासून मनुष्यबळ कमी आहे. तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक कोविड रुग्णाची काळजी घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार गरजेचे असतात. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतात. परंतु, उपचारानंतर त्या रुग्णाची सेवाशुश्रूषा करण्याचं काम परिचारिका म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागते. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचं पथ्यपाणी सांभाळणेदेखील तितकेच गरजेचे असते. रुग्ण दाखल झाल्यापासून बरे होऊन घरी जाईपर्यंत आम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आमच्यातील काही सहकारी परिचारिका कोविड पॉझिटिव्ह होऊनही बऱ्या झाल्यानंतर पुन्हा रुग्णांच्या सेवेत येतात. तसेच, आमच्या आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने रजा न घेता वर्षभर काम केले. त्यामुळे त्यांना साथ देण्याचे आम्ही कर्तव्य बजावत आहोत. आता कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याचे समाधान वाटत आहे.”
मी दार्जिलिंग येथे आर्मीमध्ये ज्युनिअर अभियंता म्हणून कार्यरत आहे. आम्ही देशसेवा स्वीकारली आहे; परंतु मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. घरी लहान मुले असतानाही ती एकही रजा न घेता रुग्णांची सेवा करीत आहे.
- सुशील खाटमोडे, सीमा सुरक्षा दल, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
आपल्या देशावरील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत आहे. आमचे वैद्यकीय अधिकारी व सहकारी परिचारिका यांनी एकमेकांना धीर देत आम्ही अखंड रुग्णसेवा करतो. प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी मला माझे कुटुंब, सोसायटी व सहकारी यांची चांगली साथ मिळत आहे.
- अर्चना खाटमोडे, अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य रुग्णालय, आळंदी