दंड भरायला सांगितला म्हणून भररस्त्यात मांडले ठाण

By admin | Published: July 9, 2015 02:57 AM2015-07-09T02:57:26+5:302015-07-09T04:41:31+5:30

मंगळवारची दुपारची वेळ... ठिकाण सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर... एक माणूस दुचाकीवरुन जाताना त्याने सिग्नल तोडला...

Than was presented in the palace as he was asked to pay the penalty | दंड भरायला सांगितला म्हणून भररस्त्यात मांडले ठाण

दंड भरायला सांगितला म्हणून भररस्त्यात मांडले ठाण

Next

पुणे : मंगळवारची दुपारची वेळ... ठिकाण सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर... एक माणूस दुचाकीवरुन जाताना त्याने सिग्नल तोडला... नियमाचे उल्लंघन केले म्हणून वाहतूक पोलिसांनी अडविले आणि दंड भरायला सांगितला. त्यामुळे चिडलेला दुचाकीस्वार दंड भरणार नाही असे सांगत चक्क वाहने जात असलेल्या रस्त्याच्या मध्यात ठाण मांडले. वाहतूक पोलिसांनी समजूत काढूनही न ऐकणाऱ्या या बहाद्दरावर कारवाईचा बडगा उगडण्याचे आदेश मिळताच, त्याने चुपचापणे दंड भरला. हा भलता प्रकार बुधवारी शहरातील चर्चेचा विषय झाला होता. व्हॉट्सअ‍ॅपवरून हा विषय आणि त्याची छायाचित्रे दिवसभर फिरत होती.
सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर येथे सिग्नल तोडला म्हणून एका दुचाकीस्वाराला महिला पोलिसांनी अडविले आणि १०० रुपयांचा दंड भरायला सांगितले. दंड भरायला सांगताच दुचाकीस्वार चिडला आणि त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि थेट वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याच्या मधोमध जाऊन तो बसला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मात्र तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहतुकीला अडथळा होत असल्याने तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या दुचाकीस्वार ऐकायलाच तयार नव्हता.
त्या वेळी दत्तवाडी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक भुजबळ तेथून चालले होते. हा प्रकार पाहून भुजबळ यांनी वाहतूक पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. दुचाकीस्वाराचा हा प्रताप पाहून भुजबळ यांनी संबंधित दुचाकीस्वारावर थेट वाहन परवाना जप्त करण्याची कारवाई करा, असा आदेश दिला. हे ऐकताच दुचाकीस्वार रस्त्यावरून उठला आणि त्याने चुपचाप १०० रुपये दंड भरला आणि तो निघून गेला. मात्र हा प्रकार या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. काहीजणांनी या घटनेची छायाचित्रे काढली आणि आज ती व्हॉट्सअ‍ॅपवर टाकली. त्यामुळे बुधवारी शहरात चर्चा रंगली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Than was presented in the palace as he was asked to pay the penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.