पुणे शहरात अर्ध्या तासात धो धो, शहरात आतापर्यंत ९०१़ मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 10:54 PM2017-10-22T22:54:49+5:302017-10-22T22:55:03+5:30
दिवाळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी दुपारी पुणे शहरात अर्धा तास जोरदार वर्षाव केला़ या पावसाने शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाण्याचे पाट वाहू लागले होते.
पुणे - दिवाळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी दुपारी पुणे शहरात अर्धा तास जोरदार वर्षाव केला़ या पावसाने शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाण्याचे पाट वाहू लागले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झाली होती़
दिवाळीच्या अगोदर लागोपाठ चार पाच दिवस दुपारच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस पडत होता़ त्यामुळे दिवाळीतही पाऊसाशी सामना करावा लागतो की काय असे वाटत असतानाच गेल्या सोमवार ते शनिवारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती़ रविवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते़ दुपारी सव्वाचारच्या सुमारास अचानक पावसाच्या जोरदार सरी येऊ लागल्या़ अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली़ शहरातील मध्य भाग, शिवाजीनगर, कोथरुड परिसरात पावसाचा जोर जास्त होता़ साधारण अर्धा तास पडलेल्या या पावसाने रस्त्यावरुन पाणी वाहू लागले होते़ कात्रज परिसरातही हलका पाऊस झाला़ कात्रज येथे सायंकाळपर्यंत ३़२ मिमी पावसाची नोंद झाली होती़ रात्री उशिरापर्यंत अधून मधून सरी येत होत्या़
पुणे शहरात आॅक्टोंबर महिन्यात सरासरी ७७़९ मिमी पाऊस पडतो़ पण, यंदा रविवारअखेरपर्यंत १८०़४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ तो सरासरीपेक्षा १०२़५ मिमी जास्त आहे़ पुणे शहराची पावसाची वार्षिक सरासरी ७२१़७ मिमी आहे़ यंदा जूनपासून आतापर्यंत ९०१़४ मिमी पाऊस झाला आहे़ तो सरासरीपेक्षा १७९़७ मिमी जास्त झाला आहे़ शहरात पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
़़़़़़़़
आॅक्टोंबरमधील चौथा सर्वाधिक पाऊस
पुणे शहरात आॅक्टोंबरमध्ये सर्वाधिक पाऊस १८९२ मध्ये ४४०़७ मिमी झाला होता़ गेल्या दहा वर्षात आॅक्टोंबर २०१० मध्ये २६३ मिमी, २०११ मध्ये १८६़३ मिमी आणि यंदा आतापर्यंत १८०़४ मिमी पाऊस झाला आहे़ आॅक्टोंबरमधील अजून ७ दिवस बाकी आहेत़