Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:35 PM2024-07-26T13:35:56+5:302024-07-26T13:37:48+5:30
आम्ही सगळया वस्तू घरात ठेवून नातेवाइकांकडे गेलो होतो, त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत
पुणे: किचनमध्ये काहीच राहिलं नाही, आमचा संसार वाहून गेला. त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत, आम्ही सगळ्या वस्तू घरातच ठेवल्या होत्या. फक्त मोबाईल घेऊन नातेवाईकांकडे गेलो होतो. वॉशिंग मशीन, फ्रिज सगळं मुलांची पुस्तक, आमची महत्वाची कागदपत्रे सगळं वाहून गेलं. काही राहिलं नाही. आता आम्ही काय करायचं, आमची कोण नुकसानभरपाई करून देणार..! अशी व्यथा मांडताना सिंहगड रोडच्या विठ्ठलवाडी नदीकाठ परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले.
सिंहगड रोड परिसरातील विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातही काल पाणी शिरले होते. पण त्याठिकाणी राहणारे नागरिक नातेवाईकांकडे गेले होते. ते सकाळी घरी आले असता घरातील सर्व संसार वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पार्किंगमधून गाड्या काढणेही अवघड झाले होते. काल सकाळच्या सुमारास रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. काल या सर्व पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील पाणी साचलेल्या भागात पाहणी केली होती. यावेळी विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातील नागरीकांचा संसार पाण्यात वाहून गेला. माध्यमांसमोर व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.
योग्य ती कारवाई होणार - मोहोळ
आज सकाळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सिंहगड रोड परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नागरिकांना आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, नागरिकांना हा त्रास पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत. काही ठिकाणी नदीपात्र अरुंद आहे, पूररेषा निश्चित करायची आहे. हे सर्वही पाहावे लागणार आहे. या भागात पाणी कधीच येणार यासाठी कायमस्वरूपीच नियोजन आपण करणार आहोत. लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या आहेत. आता प्रशासकीय पातळीवर सर्व मदतकार्य सुरु आहे. लोकांना सुविधा देणे, स्वच्छ पाणी पुरवणे यासाठी महापालिकेची यंत्रणा काम करत आहे. ४० हजार क्यूसेसच्या वर पाणी सोडलं गेलं आहे. नागरिकांना त्याअगोदर अलर्ट का दिला नाही याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात का समन्वय साधला गेला नाही याचीही चौकशी केली जाईल. आणि योग्य ती कारवाई आम्ही करू. आता सद्यस्थितीत या भागातील नागरिकांना मदत करणे यालाच प्राधान्य दिले जाईल.