पुलाच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:01 PM2018-09-30T23:01:53+5:302018-09-30T23:02:12+5:30
भीमा-भामा नदी परिसर : गावांत कचरा उचलण्याची यंत्रणा असूनही रस्त्यावरच साचतोय ढीग
शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव व शेलगाव हद्दीत भीमा-भामा नदीलगत मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे शेलपिंपळगाव व शेलगाव ग्रामपंचायतीने आपापल्या हद्दीत कृपया येथे कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचनाफलक लावले आहेत. मात्र याच दोन्ही फलकांसमोर रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याचे विद्रूपीकरण होत असून प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. गावात कचरा उचलण्याची योग्य व्यवस्था असतानाही केवळ ग्रामस्थांच्या आडमुठेपणामुळे कचºयाचे ढीग दिवसागणिक वाढत चालले आहेत.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, शेलगाव ही महत्त्वपूर्ण गावे आहेत. वाढत्या विकासामुळे गावच्या परिसरात नागरिकीकरण वाढत चालले आहे. परिणामी उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी भाड्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गावात रहिवासीसंख्याही वाढत असून त्याबरोबर कचºयाचे प्रमाणही वाढत आहे. कचरा व्यवस्थापन व्हावे, यासाठी शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीकडून घंटागाडीद्वारे कचरा गोळा केला जात आहे. परंतु गावात कचरा गोळा करण्याची व्यवस्था असतानादेखील नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे.
त्यामुळे चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील भीमा नदीवरील पुलाच्या दुतर्फा कचºयाचे ढीग साचत आहेत. यामध्ये प्लॅस्टिक कचरा, हॉटेलमधील शिळे खाद्यपदार्थ, कापलेले केस, सडलेला कांदा, खराब पालेभाज्या यांचा समावेश आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना नाक दाबून मार्गस्थ व्हावे लागत आहे. गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुविधा असतानादेखील रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने सरपंच विद्या मोहिते व शेलगावचे सरपंच नागेश आवटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सरपंच विद्या मोहिते म्हणाल्या, की हॉटेल व्यावसायिक व रस्त्यावरून येणाºया-जाणाºया बाहेरच्या वाहनांतून या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.