वेस्ट टू एनर्जीतून वीजनिर्मिती, शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:18 AM2017-10-26T01:18:06+5:302017-10-26T01:18:18+5:30
पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महत्त्वाचा आहे. देशातील प्रमुख महापालिकांत हा प्रकल्प राबविला जात आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार असून, शहराच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत काळ्या यादीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य नीलेश बारणे यांनी केला होता. याचे आयुक्तांनी खंडन केले आहे.
दरम्यान, हा प्रकल्प राबविल्यामुळे मोशीकरांना दुर्गंधीला सामोरे जावे लागणार आहे. कचरा जिथे निर्माण होतो. तिथेच जिरविण्यात यावा अशी मागणी करत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यास विरोध दर्शविला होता.
मात्र, पारदर्शक कारभाराचे गाजर दाखवून सत्ताधारी आणि प्रशासन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घालत आहे. कामाची निविदा पूर्णपणे पारदर्शकपणे काढली आहे. निविदेसाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती, असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘सहाशे टन कचºयापासून आठ मेगावॉट वीज निर्माण होईल. ती वीज पालिकाच खरेदी करणार आहे. हा प्रकल्प दिल्लीत प्रथम सुरू झाला. जबलपूर, सुरतमध्ये तो सुरू आहे.’’
>आयुक्तांचा पारदर्शकतेचा दावा
आरोग्याचे तीन तेरा वाजले असताना वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. हर्डीकर म्हणाले, ‘‘ओल्या कचºयाचा वास येतो. त्यामुळे नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे गरजेचे आहे. ओला कचरा मोशी डेपोवर आला नाही तर दुर्गंधीचा त्रास होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ओला कचरा जिथे तयार होतो. तिथेच जिरविला पाहिजे. तसेच बांधकामाचा कचरा, इतर राडारोडा वेगळ्या पद्धतीने गोळा करण्यात येणार आहे. शहरात कचºयाची समस्या आहे. परंतु, त्यासाठी लागणारे मनुष्यबळदेखील उपलब्ध नाही. तरीही आम्ही दररोज कचरा उचलला जावा, यासाठी प्रयत्न करत आहोत. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात येणार आहे. कोणी काय आरोप केला याबाबत मी बोलणार नाही. माहिती चुकीची आहे.’’