हजारो लिटर पाणी वाया

By admin | Published: May 29, 2015 12:57 AM2015-05-29T00:57:42+5:302015-05-29T00:57:42+5:30

खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

Waste thousands of liters of water | हजारो लिटर पाणी वाया

हजारो लिटर पाणी वाया

Next

विश्वास खोड ल्ल पुणे
पुण्यात पाणी बचतीसाठी पाणीकपातीचे धोरण राबविले जात आहे. असे असतानाही मात्र, खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही गळती सुरू आहे. मात्र ही गळती दुरुस्त करण्याऐवजी पाटबंधारे खात्याने महापालिकेलाच जबाबदार धरले आहे.
महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते. कालव्याच्या मुखापासून पर्वती पायथ्यापर्यंत पाणी येईपर्यंत काही ठिकाणी शेतासाठी, टँकर भरण्यासाठी, वॉशिंग सेंटरसाठी चोरून पाणी वापरले जाते. सध्या सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. मात्र हिंगण्याच्या डोंगराळ भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
या गळतीमधून किती पाणी वाया जाऊन नदीत मिळते याचे मापन आजवर झालेले नाही. डोंगराळ भागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या हिंगण्यातील भागात कालवा दुरुस्त करणे अवघड असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने यापूर्वी केला आहे. या बाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेलाच जबाबदार धरले आहे. सिंचनासाठी आवर्तन सुरू नसताना कालव्यातील पाण्याची पातळी कमी असतानाही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास प्रतिसेकंद तीनशे क्युसेक्सने पाणी द्यावेच लागते. त्यामुळे पूर्णपणे पाणी सोडणे थांंबविता येणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून होणाऱ्या पालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभागातील वादाची चर्चा यंदा फारशी झाली नाही. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा एक अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणीसाठा अधिक असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा असून, पुण्यावर पाणी कपातीची वेळ येणार नाही, असे आश्वासन दिले जात आहे.

1पावसाविषयी खात्री नसताना शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पालिकेचे अधिकारी चिंताग्रस्त आहेत. प्रत्यक्षात कालव्यातून गळती होणाऱ्या पाण्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागच नव्हे तर तत्कालीन पालक मंत्रीही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. दर आवर्तनाच्या वेळी या मुठा कालव्यातून पाणी वाया जात आहे. सध्याही सिंचनासाठी पाणी सोडले जात असताना हिंगणे भागात या कालव्यातून धो-धो पाण्याची गळती होत आहे.
2महानगरपालिका पंधरा टी.एम.सी. पाण्यासाठी दरवर्षी २७ कोटी रुपये खडकवासला पाटबंधारे विभागास देते. जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागच जबाबदार असून, त्याबाबत
काहीही हालचाली होत नसल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी असलेल्या पाण्याची नासाडी अशाच प्रकारे होत राहणार असल्याचे
स्पष्ट आहे.

 

Web Title: Waste thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.