हजारो लिटर पाणी वाया
By admin | Published: April 25, 2016 01:55 AM2016-04-25T01:55:07+5:302016-04-25T01:55:07+5:30
बारामती तालुक्यातील सुपे येथे मोरगाव प्रादेशिक योजनेद्वारे आलेली जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे.
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे मोरगाव प्रादेशिक योजनेद्वारे आलेली जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, जलवाहिनीची दुरुस्ती चालल्याची माहिती दिली.
याबाबत कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. मागील दोन महिन्यांत हजारो रुपये खर्च करून नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहेत. मात्र, या संदर्भात कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मागील पंधरवड्यात मोरगावनजीक अशा पद्धतीने पाईप फुटून मोठ्याप्रमाणात पाणीगळती झाली होती. त्यामुळे गेली आठ दिवस त्या भागात पाणीपुरवठा झाला नव्हता.
राष्ट्रवादी व्यापार व उद्योगचे तालुकाध्यक्ष संजय दरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी नाझरे पाईपलाईनच्या एअर व्हॉल्व्हमधून मोठ्या क्षमतेने पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले.
सुपे येथे सध्या आठ दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. येथील हातपंप, खासगी विहिरी, बोअरवेल, शासकीय नळ पाणीपुरवठ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत.
सध्या येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या परिस्थितीत भोंडवेवाडी फाट्यानजीक सुप्याकडे येणाऱ्या नाझरे पाईपलाईनमधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे.