कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प ठप्प
By Admin | Published: December 27, 2016 03:27 AM2016-12-27T03:27:28+5:302016-12-27T03:27:28+5:30
महापालिकेकडून मोठा गाजावाजा करून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी उभारलेल्या ९ प्रकल्पांतून कोणत्याही प्रकारची वीज अथवा गॅसनिर्मिती
पुणे : महापालिकेकडून मोठा गाजावाजा करून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी उभारलेल्या ९ प्रकल्पांतून कोणत्याही प्रकारची वीज अथवा गॅसनिर्मिती होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च होऊनही ते बंद राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये स्थानिक ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यास विरोध करण्यात येत असल्याच्या पार्र्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात उभारणी करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. शहराच्या विविध भागांत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे २५ छोटे प्रकल्प उभारण्यात आले. या प्रकल्पांमध्ये १२५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून वीज, गॅसनिर्मिती करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यापैकी ९ प्रकल्पांमधून कोणत्याही प्रकारची वीज अथवा गॅस निर्मिती होत नसल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर चालू असलेले उर्वरित प्रकल्पही खूपच कमी क्षमतेने सुरू आहेत. नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल सुधीर जटार व सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीतून हा प्रकार उजेडात आला आहे. कात्रज येथील २ प्रकल्प, वानवडी, पेशवे पार्क, हडपसर येथील प्रत्येकी १ असे एकूण ५ प्रकल्प पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. याठिकाणांहून कोणतीही वीज व गॅस निर्मिती झालेली नाही. त्याचबरोबर औंध, येरवडा, वडगावचे येथील ४ प्रकल्पांमधूनही १ युनिटही वीज निर्मिती झालेली नाही.
हडपसर रॅम्प येथे १५ टक्के तर औंध, बाणेर भागात ४० टक्के कचरा जिवरला गेला. एकूण १२५ टन कचरा साठविण्याची क्षमता असलेल्या प्रभागातून आकडेवारीनुसार केवळ
६० टक्के कचरा जिरविला गेला
आहे. वस्तुत: ही आकडेवारी माहिती अधिकारात प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. ती बरीच फुगवलेली असण्याचीही शक्यता आहे.
मेजर जनरल सुधीर जटार यांनी सांगितले, ‘‘कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारताना या प्रकल्पांचा आराखडा तयार करणे आवश्यक होते. या प्रकल्पांची पर्यावरण, आर्थिकदृष्टया छाननी केली गेली नाही. त्यामुळे भरवस्तीमध्ये हे प्रकल्प उभारले गेले आहेत.
या प्रकल्पांमधून बाहेर
पडणारी दुर्गंधी, ज्वालाग्राही मिथेन वायू याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कचरा
वर्गीकरण न करता काही
प्रकल्पांमध्ये येत असल्याने
प्रदूषण होत आहे.’’
संपूर्ण प्रकल्पांमधून फक्त ८ टक्के वीजनिर्मिती
- गॅस निर्मितीमध्ये १ घनमीटर कचऱ्यापासून १.२० युनिट वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. त्यानुसार ५ टनांच्या प्रकल्पांमध्ये मिळून दरमहा साडेचार लाख युनिटची वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे.
त्यातून मनपाचे २८ लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची वीज बचत होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पांमधून केवळ ८ टक्के वीजनिर्मिती झाली असल्याचे उजेडात आले आहे.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा अतिरिक्त फायदा कचरा प्रकल्पांमध्ये कचरा जिरविणे हेच उदिदष्ट आहे, त्यापासून वीजनिर्मिती हा अतिरिक्त फायदा आहे. कचरा प्रकल्प हे एकूण क्षमतेच्या ६० ते ७० टक्के इतकेच चालतात. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ५ प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्याने ते बंद आहेत.
- सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा विभाग