तरंगता पूल पुरात धोकादायक

By admin | Published: June 29, 2015 06:40 AM2015-06-29T06:40:59+5:302015-06-29T06:40:59+5:30

मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे.

Wasteland is dangerous for bridges | तरंगता पूल पुरात धोकादायक

तरंगता पूल पुरात धोकादायक

Next

मिलिंद कांबळे, पिंपरी
बोपखेलच्या रहिवाशांसाठी कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) तरंगता पूल बांधून देऊन त्यावरून रहदारी सुरू केली आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीएमईने बोपखेल-दापोडी हा नेहमीच्या वापरातील रस्ता १३ मे रोजी ग्रामस्थांसाठी बंद केला. त्याविरोधात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून दगडफेकीचा प्रकार घडला. सुमारे २०० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे तणाव वाढला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आदेश दिल्यानंतर सीएमईने तात्पुरत्या स्वरूपात बोपखेल-खडकी असा तरंगता पूल बांधला. तो ७ जूनला खुला करण्यात आला.
अद्याप पुणे परिसरात पावसाचा जोर नाही. पावसाने जोर धरल्यास नदीतील पाण्याची पातळी वाढून रस्ता पाण्यात जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने पूल बांधून ठेवल्याने तो तरंगत राहील. पूर आल्यास हा पूल वाहून जाण्याचा धोका आहे.
पाणीपातळीतील वाढीमुळे पूल व रस्त्यामध्ये अंतर पडल्यास सीएमईचे जवान त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करतील. मात्र, त्यापूर्वी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक
४हा तात्पुरता पूल असल्याने त्यावरून नियमितपणे वाहतूक करणे सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य ठरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मावळ आणि मुळशी तालुका परिसरात नुकताच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुळा आणि पवना नदीपात्रात वाढ होऊन पातळी वाढली. दापोडी येथे पवना नदी मुळेला मिळते. त्यापुढे प्रवाह वाढून खडकी, बोपखेल परिसरातून मुळा नदी वेगात वाहते. वेगातील पाणी आणि जमा झालेल्या जलपर्णीमुळे शनिवारी (दि. २७) पहाटे पुलाचा दोर तुटला. त्यामुळे पूल आणि खडकी रस्त्यामध्ये अंतर पडले होते. पूल धोकादायक झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सीएमईच्या जवानांनी त्वरित दुरुस्ती करीत दोर बांधून, खडी आणि माती टाकून रस्ता दुरुस्त केला. दुपारनंतर नियमित वाहतूक सुरू झाली.

गॅस सिलिंडरसह सायकल वाहून गेली
गॅस सिलिंडर घेऊन एक जण सायकलवर चालला होता. पुलावरून जाताना त्याचा तोल गेला. सिलिंडरसह सायकल पुलावरून नदीपात्रात पडली. सुदैवाने सायकलस्वार बचावला. शोध घेऊनही सायकल आणि सिलिंडर सापडले नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.

रस्त्यासाठी अद्याप एनओसी नाही
खडकीच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या बाजूने ४०० मीटर अंतराचा पक्का रस्ता करण्यास लष्करी विभागांनी अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिलेले नाही. सीएमईने नदीकडेच्या दलदलीत मुरुम आणि खडी टाकून रस्ता बनविला आहे. पावसाच्या पाण्यामुळे तेथे वारंवार चिखल होत आहे. त्यात वाहनाचे चाक रुतून बसते. ये-जा करणे गैरसोईचे ठरत आहे. एनओसी देण्याचा आदेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीत दिले होते.

६ जुलैला सुनावणी
बोपखेल-दापोडी हा सोईचा रस्ता लष्करी जाचातून खुला करून महापालिकेच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग धोदाडे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याबाबतचा निर्णय सीएमईच्या बाजूने लागला. सीएमईने सुरक्षेच्या कारणाने हा रस्ता १३ मेपासून बंद केला. या संदर्भात महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय १ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करेल. त्यावर ६ जुलैला सुनावणी होईल.

पाणी वाढल्यास मुळा नदीला पूर येऊ शकतो. साहजिकच तरंगत्या पुलास धोका होऊ शकतो. खडकी जोडरस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. सीएमईचे जवान तेथे मुरुम टाकून त्वरित दुरुस्ती करीत आहेत. लष्करी विभागांनी एनओसी दिल्यास महापालिकेतर्फे त्वरित डांबरीकरण केले जाईल.
- संजय काटे, नगरसेवक

सीएमईतील रस्ता आमचा नाही, असे महापालिकेने सांगितल्याने उच्च न्यायालयाने सीएमईच्या बाजूने निकाल दिला. कागदपत्रे आणि पूर्वीचे दाखले तपासल्यास सीएमईतील रस्त्याचा हक्क बोपखेलगावाकडे आहे. या संदर्भात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयास प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- श्रीरंग धोदाडे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Wasteland is dangerous for bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.