मैलापाणी पुनर्वापर प्रकल्प प्रतिकृती ठाकरेंसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:38+5:302021-03-14T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित जायकासारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित जायकासारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या कार्यकर्त्याने निर्माण केला आहे. या ‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पा’चे सादरीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर शनिवारी (दि. १३) करण्यात आले.
महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शुद्ध पाणी वापरून झाल्यावर ते सरळ नदीमध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास, नद्या, नाले स्वच्छ राहू शकतात. पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. नदीचे प्रदूषण न होता सांडपाण्यातून मिथेन, खत, गॅस निर्मिती कशी होऊ शकते याची प्रतिकृती चल देखाव्याद्वारे राऊत यांनी ठाकरे यांच्यासमोर सादर केली. मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’ला साजेसा असा हा प्रकल्प सोसायटी, झोपडपट्टी, मोठमोठ्या टाऊनशिपमध्ये तसेच शहर पातळीवरही अमलात येऊ शकतो, असा राऊत यांचा दावा आहे.
राज ठाकरे यांनी राऊत यांच्या या प्रकल्पाची पाहणी केली. त्यावर काही सूचनाही केल्या. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही हा प्रकल्प दाखवावा, असे ठाकरे यांनी या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.